Join us

फक्त सिनेमात फिल्मी न्याय मिळेल! वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 18:37 IST

वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता यावर अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदे प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली आहे. 

पुण्यातील पोर्शे कार अपघाताचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईतीलवरळीत एक भीषण घटना घडली. भरधाव बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीस्वार जोडप्याला धडक दिली, या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता यावर अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदे प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली आहे. 

उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन या अपघातासंदर्भातील एक सोशल पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने संताप व्यक्त केला आहे. "फार फार तर उद्या सिंबा, सिंघम, सूर्यवंशी यांसारख्या चित्रपटाची सुरुवात या अपघाताने होईल आणि त्या सिनेमात फिल्मी न्याय मिळेल. सत्यात न्याय देणारे न्याय मिळू देणार नाहीत. मराठीचा टेंभा मिरवणारे मराठी माणसाला न्याय मिळवून देतील का? आता दुकानदारांची सेटलमेंट होईल", असं त्याने इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह चालवत होता. मिहीर शहाने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता त्या महिलाला फरफटत नेलं. यातच महिलेचा मृत्यू झाला. वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत पावलेल्या महिलेचं नाव कावेरी नाखवा असं आहे. मृत महिला अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी आहे. अपघातानंतर जयंत वाडकर यांनीदेखील पोस्टमधून न्याय देण्याची मागणी केली आहे. 

वरळीतील या अपघातानंतर शिंदे गटाच्या राजेश शाह यांना अटक करण्यात आली होती. तर कार चालवणारा त्यांचा मुलगा मिहीरने पळ काढला होता. अखेर मिहीरला आज शहापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  

टॅग्स :वरळीमुंबईअपघातमराठी अभिनेता