Join us

"यमुने ही हाक छोट्या पडद्यावर आली आणि...", तेजश्री वालावलकरने दिला 'उंच माझा झोका'च्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:05 IST

Tejashree Walawalkar : तेजश्री वालावलकर हिने इंस्टाग्रामवर 'उंच माझा झोका' मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत.

एकेकाळी गाजलेल्या मालिकांमध्ये विरेन प्रधान दिग्दर्शित 'उंच माझा झोका' (Uncha Maza Jhoka) मालिकेचा समावेश आहे. या मालिकेत रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास अधोरेखित करण्यात आला होता. या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं ते छोट्या रमाबाईंनी. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार तेजश्री वालावलकर (Tejashree Walawalkar) हिने निभावली होती. आज या मालिकेला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने तेजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

तेजश्री वालावलकर हिने इंस्टाग्रामवर 'उंच माझा झोका' मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की,''आज ५ मार्च २०२५. गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजे १३ वर्षांपूर्वी याच दिवशी तो क्षण आला होता ज्याची वाट सगळे बघत होते.झी मराठीवर पहिल्यांदा झुले उंच माझा झोका हे टाइटल साँग वाजले होते आणि पहिला एपिसोड प्रसारीत होऊन मालिकासृष्टी बदलून टाकणाऱ्या , स्वतःचं नवं सोन्याचं पान, अढळ स्थान निर्माण करणाऱ्या आणि फक्त प्रेक्षकांच्याच नाही तर एका नव्या इतिहासाचा झोका उंच नेणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या उंच माझा झोका या मालिकेला सुरुवात झाली होती.'' 

तिने पुढे म्हटले की, ''यमुने ही हाक छोट्या पडद्यावर आली आणि सगळे त्या सालस भावात सात्विक काळात रमून गेले.आणि सुरू झाला एक नवा प्रवास…..माझा तेजश्री चा ही रमा म्हणून….असख्य अनुभव, अगणित प्रेम आणि द्विगुणीत आशीर्वाद मिळवून देणाऱ्या या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात आजच झाली होती….. अजूनही आठवतय उंच माझा झोका चा पहिला एपिसोड प्रसारीत झाला आणि फोन, मेसेजनंतर पत्रांनी मन भरून गेलं….काही दिवस हे विसरता येत नाहीत कारण ते सगळ्यांच्या प्रेमाने भरलेले असतात तुमच्या रसिकांच्या प्रेमाने गेलेला हा उंच माझा झोका आणि आजची ही ५ मार्च तारीख नेहमीच खास राहील…. हा प्रवास खास झाला हे साकारू शकलं झी मराठी, विरेंद्र प्रधान, बवेश जानवलेकर, सुगंधा लोणीकर, निखिल साने, विक्रम गायकवाड हे यांच्या मुळेच…..''