Join us

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत औरंगजेबच्या भूमिकेत झळकणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 4:39 PM

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती  फत्ते केली मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी. एक वाघ तर दुसरा सिंह.चारही दिशांना विखुरलेले अवघे मराठी लष्कर या दोन सेनानींच्या नेतृत्वाखाली आणि ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात एकवटले आणि मराठी साम्राज्यात देदीप्यमान इतिहास घडला.

संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती की, मोगली घोडे मराठी मुलखाचे पाणी प्यायला बिचकू लागले. तुम्हांला पाण्यात काय संताजी-धनाजी दिसतात का....असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले.

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांच्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या तालमी सुरू आहेत. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी हे दोन्ही कलाकार अतिशय कसून मेहनत घेत आहेत.

मराठ्यांना धुळीस मिळवायचे, भगवा ध्वज कायमचा उखडून फेकायचा, या ईर्षेने आपल्या अफाट सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या सर्वसत्ताधीश औरंगजेबाला ताराराणींनी आपल्या पराक्रमाने दख्खनच्या मातीत गाडला. त्याची कबर औरंगाबादेत, मुलखातच खोदली गेली.

ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मालिकेत औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. व्यक्तिरेखेचा  प्रचंड अभ्यास करणारा यतीन कार्येकरांसारखा  सामर्थ्यशाली अभिनेता या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रोमोमधला औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावा, असा अभिनय त्यांनी केला आहे. इतिहासातला सर्वांत क्रूर, संशयी, जुलमी, कपटी बादशाह  असलेल्या औरंगजेबाची भूमिका शब्दश: जिवंत झाल्याचा भास  त्यांच्याकडे  पाहून होतो. त्यांचा हा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.