सध्या बॉलिवूड व टीव्ही इंडस्ट्रीत वेडिंगचे सीझन सुरु आहे. आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. होय, लोकांची आवडती मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ची अभिनेत्री दिव्या भटनागर लग्नबेडीत अडकली आहे. दिव्याने लग्नाचा फोटो शेअर करत, ही गोड बातमी चाहत्यांना दिली. आता दिव्याचा नवरदेव कोण, हा विचार तुम्ही करत असाल. तर त्याचे नाव गगन.दिव्या व गगनने मुंबईच्या एका गुरूद्वारात साता जन्माची गाठ बांधली. ‘आम्ही केले’ असे लग्नाचा फोटो शेअर करताना दिव्याने लिहिले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने ही माहिती दिली. ‘आम्हाला सिंपल लग्न हवे होते. आमच्या लग्नात केवळ जवळचे मित्र हजर होते. मेहंदी, हळद, चूडा सेरेमनी अशा सगळ्या विधींसह आम्ही लग्न केले. माझ्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे ते या लग्नाला हजर नव्हते,’ असे तिने सांगितले.
‘लग्नाचा निर्णय आम्ही अचानक घेतला. पाच वर्षांपासून आम्ही एकमेकांसोबत आहोत. आम्ही अनेक वादळे सोसली. पण याऊपरही आम्ही एकमेकांसोबत राहिलो. अनेकदा आम्ही लग्नाचा विचार केला होता. पण प्रत्येकवेळी काही ना काही अडचण आली. 2015 मध्ये आम्ही कुटुंबाच्या अनुपस्थितीच साखरपुडा केला होता. माझ्या आईचा या लग्नाला विरोध होता. कारण आम्ही वेगवेगळ्या जातीचे आहोत. आम्ही त्यांना अनेकपरीने समजवण्याचे प्रयत्न केलेत. 2017 मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतरचा काळ खूप कठीण होता. पण मी स्वत:ला सावरले. माझी आई या लग्नात नव्हती, याचे दु:ख नेहमी असेल,’ असेही तिने सांगितले.