‘स्टार प्लस’ वाहिनीवर सर्वाधिक काळ प्रसारित होत असलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे प्रेम मिळते आहे. आताच्या कथानकात प्रेक्षकांना दिसत आहे की पुरुकाका हा नायराला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कसा प्रयत्न करीत आहे; पण अखेरीस नायरा त्याच्या तावडीतून सुटेल काय आणि ती पुरुकाकाचे खरे स्वरूप उघड करील काय?
आपल्या संपन्न आणि पुरोगामी कथानकाद्वारे या मालिकेने प्रेक्षकांमध्ये सांस्कृतिक मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचा कुटुंबातच होत असलेल्या लैंगिक छळवणुकीच्या मुद्द्याला या मालिकेने हात घातला आहे. मालिकेच्या आगामी कथानकाबद्दल सांगताना निर्माते राजन शाही म्हणाले, “भारतीय समाजाला आज भेडसावीत असलेल्या अनेक मुद्द्यांपैकी एक प्रमुख मुद्दा आहे महिलांच्या होत असलेल्या कौटुंबिक लैंगिक छळवणुकीचा. खरं म्हणजे आजच्या भारतीय महिला या आपल्या घरातच असुरक्षित आहेत, ही आजची दुर्दैवी वस्तुस्थिती असून त्यांनी जरी आपल्या वडिलधाऱ्या व्यक्तींकडे याबद्दल उल्लेख केला, तर त्यांच्याकडून या मुद्द्याकडे कानाडोळा केला जाते. कारण अशी काही घटना समाजात उघड झाली, तर त्या कुटुंबाची अब्रू जाते आणि बळी पडलेल्या महिलेचीही बदनामी होते. त्यामुळे अशा घटना चार भिंतींच्या आतच दडवून ठेवण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आता या वाहिनीवर अनेक वर्षं सुरू असलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिकेने या विषयाला स्पर्श केला असून जास्तीत जास्त महिलांनी अशा घटनांबद्दल खुलेपणानं बोलावं, असं आम्ही त्यातून आवाहन करीत आहोत. भारतीय टीव्हीवरून मांडल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक समस्यांमध्ये आजवर कौटुंबिक लैंगिक छळवणुकीच्या समस्येवर कोणी प्रकाश टाकलेला नाही. या मालिकेद्वारे महिलांना अशा घटनांबद्दल सजग करून त्यांनी या घटनांना घाबरुन न राहता संबंधित दोषी व्यक्तीला सर्वांसमोर आणण्याचं आवाहन आम्ही करीत आहोत.”
या कथानकामुळे या संवेदनशील तरीही महत्त्वाच्या समस्येवर जास्तीत जास्त चर्चा होईल, अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे.