मराठमोळी अभिनेत्री अदिती सारंगधर हे नाव रसिकांच्या चांगल्याच परिचयाचं आहे. आपल्या अभिनयाने अदितीने टीव्ही, मालिका, आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये ठसा उमटवला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत सध्या अभिनेत्री अदिती मालविकाची भूमिका साकारताना दिसतेय. तूर्तास अदितीने शेअर केलेल्या एका व्हिडीओची जाम चर्चा आहे. होय, लग्नानंतरच्या पहिल्या भांडणाचा किस्सा तिने या व्हिडीओत सांगितला आहे.‘हे तर काहीच नाय!’ या शोच्या मंचावर अदितीने नुकतीच हजेरी लावली. यावेळी तिने स्टँडअप कॉमेडी करत नवऱ्यासोबतच्या पहिल्या भांडणाचा खमंग किस्सा ऐकवला.
व्हिडीओत ती म्हणते,‘कपाटातील सगळे दागिने, सगळे कपडे मी काढले आणि बॅगांमध्ये भरले. पाच सहा सुटकेस झाल्या. एक फिल यावा की, लग्न करून मुलगी घरी परत येते, तर मी या बॅगा घेऊन येणार होते. ते सगळं गाडीमध्ये भरलं. मी त्या सर्व सुटकेस गाडीत भरल्या आणि कल्याणला गेले. लग्नानंतर त्याच बॅग लग्नाच्या दिवशी सुहासच्या गाडीत टाकल्या. लग्न झाल्याचा फील यावा म्हणून फक्त... लग्नानंतर एक नियम असतो कुठेतरी फिरायला जायचं. त्या नियमानुसार आम्ही गोव्याला गेलो. सर्व नियमानुसार जसे गोव्याला जातात, तसे आम्हीही गोव्याला गेलो आणि त्या बॅगा तशाच होत्या म्हणजे त्यांची वरात माझ्यासोबत त्याच गाडीत तशीच होती. आम्ही गोव्यावरुन परत येत होतो. गाडी भरधाव वेगात होती आणि आम्ही छान गप्पा मारत होतो. त्यावेळी बाजूने माणसे धावायला लागली. थांबवा...थांबा... गाडी थांबवा..., असे ते ओरडत होते. त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिलं तर गाडीची डिकी उघडली होती आणि मागे सर्व त्या पाच सहा बॅगा रस्त्यावर पडलेल्या होत्या. त्यानंतर नवरा बायकोचं पहिलं भांडण... तू डिकी उघडी ठेवली की मी उघडी ठेवली... असं म्हणत त्या हायवेवर झालं होतं... ’
रुईया कॉलेजमध्ये असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत गाजलेल्या मंजुळा या एकांकिकेपासून अदितीने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. छोट्या पडद्यावरील दामिनी, वादळवाट, लक्ष्य अशा मालिकांमधून ती घराघरात पोहचली. नाथा पुरे आता या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत तिने पाऊल ठेवलं. यानंतर विविध सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. प्रपोजल हे नाटक अदितीच्या कारकिर्दीतील मैलाचं दगड ठरलं.या नाटकातील भूमिकेसाठी विविध पुरस्कारानं अदितीचा गौरवही करण्यात आला.