‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Me Nandayla ) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत दाखवण्यात आलेली एक आगळी वेगळी कहाणी प्रेक्षकांना भलतीच आवडली. स्वीटू आणि ओमच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षक फिदा झालेत. मालविकाने अनेक अडथळे आणल्यानंतरही ओम आणि स्वीटू यांचं लग्न झालेलं पाहून प्रेक्षक सुखावले होते. आता तर स्वीटू ओमच्या बाळाची आई होणार आहे. मात्र आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका ‘तु तेव्हा तशी’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मालिका निरोप घेणार म्हटल्यावर कलाकार भावूक होणारच. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये मोहितची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता निखिल राऊत (Nikhil Raut) हाही असाच भावूक झाला. सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट त्याने शेअर केली आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत निखिल राऊत याने नकारात्मक भूमिका साकारली होती.
निखिल लिहितो...
अखेर येऊ कशी तशी मी नांदायला या आमच्या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं...मी गेली २० वर्ष ह्या क्षेत्रात काम करत आहे ही माझी २५ वी मालिका. खरं तर माझं पात्र ' मोहित ' हे डिसेंबर महिन्यातच संपलं होतं परंतू 'मी पुन्हा येईन ' 'मी पुन्हा येईन ', असं प्रेक्षकांना वाटत होतं ,मला देखिल ते आवडलं असतं परंतू कथेचा शेवट जवळ आला आणि पुढच्या महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. प्रेक्षकांनी ,चाहत्यांनी ह्या मालिकेला, खलनायक असलो तरीही माझ्या 'मोहित' या पात्राला आणि आम्हा सर्वांच्याच पात्रांना खूप भरभरून प्रेम दिलं त्या बद्दल मनापासून आभार ,
तसंच या मालिकेत काम करण्याची संधी दिल्या बद्दल Trump card productions निर्माते - तेजेंद्र नेसवणकर ,सुवर्णा रसिक राणे आणि झी मराठी वाहिनीचे निलेश मयेकर सर , सोजल सावंत, रेणूका जोशी, सिद्धार्थ मयेकर तसेच संपूर्ण झी मराठी वाहिनी चेही मनापासून आभार. लेखक -सुखदा आयरे, पल्लवी करकेरा, किरण कुलकर्णी , समीर काळभोर तसेच , दिग्दर्शक -अजय मयेकर , हरिष शिर्के , Direction team, उत्तम production team ,माझे spot boys मित्र आणि माझ्या सर्व सहकलाकार मित्रांचे पण खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांमुळे मोहित हे पात्र साकारता आलं. Thank you so much Love you all भेटूया लवकरच...,अशी भावूक पोस्ट त्याने लिहिली आहे.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील रंजक ट्विस्ट अँड टर्न्समुळे प्रेक्षक अगदी खिळून होते. प्रेक्षकांना स्वीटू आणि ओमची केमिस्ट्री फारच पसंत पडली होती. नाजूक अभिनेत्री आणि बॉडीबिल्डर अभिनेता या सर्व प्रकाराला फाटा देत. एक वजनदार अभिनेत्री आणि एक नाजूक आणि अगदी देखणा असा अभिनेता या मालिकेतून आपल्याला पाहायला भेटलं. मालिकेतील तोच तोचपणा बाजूला करून अगदी नवीन विषय असल्याने प्रेक्षक या मालिकेच्या प्रेमात पडले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून मालिकेत विविध बदल केले गेले आहेत. काही महिन्यांचा लीपसुद्धा घेण्यात आला होता. यांनतर मालिकेची कथा थोडी भरकटली होती. त्यामुळे या मालिकेची टीआरपीसुद्धा कमी आल्याच्या बातम्या येत होत्या.