गेल्या काही काळात छोट्या पडद्यावर अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांची निर्मिती झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात बऱ्याचशा मालिका धार्मिकेतवर आधारित असल्यामुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सध्या कलर्स मराठीवर 'जय जय स्वामी समर्थ' ही पौराणिक मालिका सुरु आहे. विशेष म्हणजे याच पौराणिक मालिकांच्या यादीत आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्येच आता योगयोगेश्वर जय शंकर ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या मालिकेतील कलाकारांची नावं समोर आली आहेत.
'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर आता 'योग योगेश्वर शंकर महाराज' यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. कलर्स मराठीने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानंतर आता या मालिकेतील कलाकारांची नाव समोर आली आहेत.
या मालिकेमध्ये पार्वतीबाई यांची भूमिका उमा पेंढारकर वठवणार आहे. तर, वडिलांची (चिमणाजी) भूमिका अतुल आगलावे साकारणार आहेत. इतकंच नाही तर बालकलाकार आरुष बेडेकर हा बाल शंकर महाराज यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
दरम्यान, प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून शंकर महाराज यांची महती, त्यांचं जीवन आणि त्यांनी भक्तांसाठी केलेलं कार्य यातून उलगडलं जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या मालिकेविषयी अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.