छोट्या पडद्यावरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ( Yog Yogeshwar Jay Shankar) या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. मालिकेत शंकर महाराजांच्या बालपणापासून सुरु झालेला हा प्रवास ज्यात त्यांनी लहानपणी केलेल्या लीला, शंकर महाराज आणि आई - वडिलांचे नाते, त्यांचे बालपण कसे होते, आणखी कोणकोणती माणसं महाराजांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना बघयाला मिळाले. आणि महाराजांनी कालांतराने जनकल्याणासाठी,आपले कार्य पूर्ण करण्याकरता गाव सोडले. याच प्रवासात त्यांच्या भक्तांनी महाराजांच्या लीला अनुभवल्या आणि कृतार्थ झाले. आता मालिका महत्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली आहे.आरुष प्रसाद बेडेकर यानं ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.मालिकेत आता मोठे शंकर महाराज दिसणार आहेत.
प्रेक्षकांना शंकर महाराजांचा पुढील जीवनप्रवास बघण्याची संधी मिळणार आहे. मोठ्या शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळ साकारणार आहे.
याबद्दल बोलताना मालिकेचे लेखक शिरीष लाटकर म्हणाले, “एक लेखक म्हणून मला असं वाटतं की 'योगयोगेश्वर जय शंकर' ही मालिका आता एका नव्या आणि रोचक वळणावर आली आहे. श्री शंकर महाराज यांच्या दिव्य प्रवासातला महत्वाचा टप्पा सुरु होतो आहे. या प्रवासात शंकर महाराजांनी अक्कलकोट, सोलापूर आणि पुणे इथे वास्तव्य केलं. अनेक अलौकीक लीला केल्या, भक्तांना जीवन जगण्याची एक आदर्श रीत घालून दिली .. त्या सगळ्याचं समग्र दर्शन या मालिकेतून घडवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
आपल्या अस्तित्वाने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चैतन्य फुलवणारे शंकर महाराज मालिकेत आता लवकरच मोठ्या रुपात दिसणार आहेत. शंकर महाराजांचे बालपण जे आजवर मालिकेत दाखविण्यात आले ते कोणीही बघितलं नव्हतं ते फक्त पुस्तकात होते. आता पहिल्यांदाच असे होणार आहे शंकर महाराजांची जनमानसात ओळखीची अशी प्रतिमा (महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात) मालिकेत बघायला मिळणार आहे. त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह आहे जी प्रतिमा आजवर पूजत आलो ती प्रतिमा बघायला मिळणार आहे. यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शंकर महाराज हे असे संत आहेत जे एकाचवेळी महाराष्ट्रातचं नव्हे तर उत्तर प्रदेशात, देशाच्या बाहेर, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करत. त्यांनी त्याठिकाणी ज्या लीला केल्या, भक्तांना जी प्रचिती आली ते मालिकेत मिळणार आहे. महाराष्ट्रामधील महाराजांचे परिचित रूप दिसणार आहेच पण त्या व्यतिरिक्त त्याच काळामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी कसे वावरत होते, कुठल्या नावाने राहात होते हे सगळं बघायला मिळणार आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास, त्यांचे जीवनचरित्र या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.