छोट्या पडद्यावरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ( Yog Yogeshwar Jay Shankar) या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत बालशंकर अंतापूर सोडून जगत कल्याणासाठी निघणार हा आध्यात्मिक टप्पा सध्या चरणसीमेवर आहे. चिमणाजी – पार्वती या दांपत्याने बालशंकरचा केलेला सांभाळ आणि आता त्याने त्यांना सोडून जाण्याचा क्षण निर्माण होणे, हे प्रेक्षकांना इमोशनल करणार आहे.
शंकर या दांपत्याला सोडून निघाला असला तरी त्याने आई पार्वतीची इच्छा पूर्ण करून तिला संततीसुख प्राप्त होईल याची दैवी रचना केली आहे, त्यानुसार पार्वतीला अपत्यप्राप्तीचे वेध लागले असून पार्वतीचे डोहाळे जेवण, शंकरच्या भावंडांचा जन्म असा रंजक कथाभाग मालिकेत सादर होणार आहे. आई आणि मुलाच्या अनोख्या नात्याचा हा अनुपम सोहळा उमा पेंढारकर आणि आरुष बेडेकर यांनी विलक्षण मायेने संस्मरणीय केला आहे. प्रेक्षक हे ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत असतात.
आरुष प्रसाद बेडेकर यानं ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.