कलर्स मराठीवर काही दिवसांपूर्वीच योग योगेश्वर जय शंकर ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेद्वारे सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला जात आहे. श्री शंकर महाराज यांच्या बालपणापासूनच श्री स्वामी समर्थांचा त्यांच्यावर कृपाशीर्वाद होता तसाच कृपाशीर्वाद शंकर महाराजांचा त्यांच्या भक्तांवर आहे. त्यापैकी एक भक्त म्हणजे श्री रघुनाथ हरिभाऊ कडलास्कर (पेंटर काका). सोलापूरात वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासून ते वयाची २० वर्ष होईपर्यंत शंकर महाराजांच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य मिळालं. विशेष म्हणजे ही मालिका सुरु झाल्यानंतर पेंटर काकांनी मालिकेत बालशंकर महाराजांची भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्या कलाकाराची भेट घेतली.
पेंटर काका यांना सोलापूरमध्ये शुभराय मठात आणि जक्कल मळ्यात शंकर महाराजांचा सहवास लाभला. १९४७ साली धनकवडी येथे महाराजांनी समाधी घेतली. त्यावेळी पेंटर काकांचे वय वीस वर्ष होते. आज पेंटर काकांचे वय ९५ वर्ष असून “योगयोगेश्वर जय शंकर” ही मालिका कलर्स मराठी वर प्रसारित होत असल्याचं समजताच त्यांना अत्यानंद झाला आणि या मालिकेतील बालकलाकाराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
या मालिकेत बालकलाकार आरुष हा बाल शंकर महाराज यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे पेंटर काका सोलापूरवरुन आपल्या लेकासह थेट मालिकेचं शुटिंग सुरु असलेल्या नाशिक येथील सेटवर पोहोचले. या भेटीतून त्यांचं शंकर महाराज यांच्यावर असलेलं प्रेम आणि श्रद्धा दिसून आली.
दरम्यान, मालिकेच्या सेटवर पेंटर काकांनी बाल शंकरला पाहताचक्षणी मिठीत घेतले आणि त्यांनी बाल शंकरला 'आजोबा' म्हणून हाक मारून कवेत घेतले. इतकंच नाही तर 'महाराजांचा पुन्हा एकदा सहवास लाभला', असे उद्गार काढले.