दिवाळीचा सण जवळ आला की, प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही प्रेक्षकांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी ‘लागिरं झालं जी’, 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली.
झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो.
प्रेक्षकांचा झी मराठी वरील हा आवडता पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लाडक्या कलाकारांनी आपल्या हटक्या अंदाजात या पुरस्कार सोहळ्याला चार चांद लावले. झी मराठीवरील अनेक कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण आहेत हे प्रेक्षकांनी दिलेल्या मतांवरून ठरले. झी मराठी अवॉर्ड्स २०१८ चे विजेते कोण आहेत हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.
सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. मालिकांमधील कलाकारांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, 'चला हवा येऊ द्या'च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि अभिजित खांडकेकर यांच्या जोडीला संजय मोने सारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने ‘झी मराठी अवॉर्डस २०१८’हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना २८ ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता झी मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.