झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका संपणार हे कळल्यापासून या मालिकेचा शेवट काय असणार, डॉक्टरला पोलीस कसे पकडणार याची उत्सुकता या मालिकेच्या फॅन्सना लागली आहे.
देवमाणूस या मालिकेत अजितकुमार आणि डिम्पल यांच्या लग्नाची तयारी सध्या सुरू असून दिव्या सिंगला अजितकुमारवर संशय आला आहे. त्यामुळे ती त्याच्याविरोधात पुरावे शोधत आहे. अजितकुमार आणि डिम्पल यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या दोघांचे मालिकेत लग्न झाल्याचे दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. पण हे लग्न सुरू असताना दिव्या सिंग पुरावे सादर करून डॉक्टरांना अटक करेल असा अंदाज लावला जात आहे.
डॉक्टर सगळ्या खुनांच्या मागे असल्याचे सगळे पुरावे आता दिव्या सिंगला मिळाले आहेत. त्यामुळे आता ती डॉक्टरला अटक करणार असून त्याचा खरा चेहरा लोकांसमोर आणणार आहे.
देवमाणूस या मालिकेत देवमाणसाच्या चेहऱ्याआड लपलेला राक्षसी चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यात मुख्य भूमिकेत 'लागीर झालं जी' मालिकेमुळे प्रकाझोतात आलेला भैय्यासाहेब म्हणजेच किरण गायकवाड झळकला. साताऱ्यामध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित ही मालिका आहे.