Join us  

आता पैठणी घेऊन येणार नाहीत भावोजी? २० वर्षांनंतर 'होम मिनिस्टर'चा निरोप? आदेश बांदेकर म्हणाले- "आता विश्रांती..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 11:42 AM

गेली २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'होम मिनिस्टर' हा शो आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेला हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बांदेकरांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

दार उघड बये दार उघड...असं म्हणत वहिनींचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर घरोघरी पैठणी घेऊन पोहोचतात. पण, आदेश बांदेकरांचा हा आवाज मात्र आता वहिनींना ऐकू येणार नाहीये. गेली २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'होम मिनिस्टर' हा शो आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेला हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बांदेकरांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

'होम मिनिस्टर' हा टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय शोपैकी एक आहे. गेली २० वर्ष अविरतपणे हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आदेश बांदेकर या शोचं सूत्रसंचालन करतात. पण, आता हा शो निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. आदेश बांदेकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट केली आहे. 'होम मिनिस्टर'च्या सेटवरील फोटो शेअर करत बांदेकरांनी ही पोस्ट केली आहे. "१३ सप्टेंबर २००४ ते १३ सप्टेंबर २०२४ (२० वर्ष) प्रवास… प्रवास…प्रवास…चला घेऊया विश्रांती", असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. त्यामुळे होम मिनिस्टर बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

आदेश बांदेकरांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "आदेश दादा म्हणजे इथून पुढे होम मिनिस्टर कार्यक्रम नाही होणार का? की तुम्ही सूत्रसंचालन करणार नाही?", "संकर्षण कऱ्हाडे किंवा निलेश साबळेला चान्स देऊन हा शो पुढे चालू ठेवा", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. १३ सप्टेंबर २००४ ला या शोचा पहिला भाग प्रसारित झाला होता. आता १३ सप्टेंबर २०२४ रोजी 'होम मिनिस्टर'चा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :होम मिनिस्टरआदेश बांदेकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता