ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, तुझ्यात जीव रंगला ही मालिका गेल्या काही आठवड्यापासून तिसऱ्या अथवा चौथ्या क्रमांकावर होती. पण या मालिकेत नुकताच आलेला ट्विस्ट लोकांना चांगलाच आवडत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या मालिकेत नुकतेच आपल्याला राणा दाचे निधन झाल्याचे पाहायला मिळाले. मालिकेतील हा नवा ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून यंदाच्या आठवड्यात तुझ्यात जीव रंगला ही मालिका बार्कच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर आहे. राधिकाने आता गुरूला चांगलाच धडा शिकवला असून प्रेक्षकांना राधिकाचे हे नवे रूप प्रचंड आवडत आहे असेच हा रिपोर्ट पाहून आपल्याला म्हणावे लागेल.
स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.
बार्कच्या रिपोर्टनुसार चौथ्या क्रमांकावर लागिरं झालं जी ही मालिका आहे. ही मालिका सुरुवातीला प्रेक्षकांची प्रचंड आवडती होती. पण गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेची लोकप्रियता कमी झाली होती. मात्र ही मालिका संपायच्या काही आठवडे अगोदर या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत होता. या मालिकेचा शेवट काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती.
पाचव्या क्रमांकावर चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न असून चला हवा येऊ द्याला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत.
गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या पहिल्या पाच भागात झी वाहिनीवरीलच या मालिकांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे.