छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. अलिकडेच लोकमान्य आणि लवंगी मिरची या दोन मालिका बंद झाल्या. टीआरपी मिळत नसल्यामुळेया मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनेलने घेतला. या मालिकांनंतर झी मराठीवरची आणखी एक गाजलेली मालिका बंद होत आहे.झी मराठीवरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे यशोदा (yashoda). फेब्रुवारी महिन्यात 'यशोदा: गोष्ट श्यामच्या आई' ही मालिका सुरु झाली होती. दुपारी प्रसारित होणाऱ्याया मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे ती संध्याकाळी प्रसारित होऊ लागली. परंतु, केवळ सहा महिन्यांमध्ये ही मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनेलने घेतला आहे. याविषयी मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.
नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पार पडलं. यावेळचा फोटो विरेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच “चित्रीकरणाचा शेवटचा दिवस. यशोदा. छोटा तरी पण मोठा प्रवास,” असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.