झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत विक्रांत सरंजामेची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे आणि इशा निमकरची भूमिका साकारणारी गायत्री दातार यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली असून या मालिकेला चांगला टीआपरी असल्याचं पाहायला मिळतं.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची मालिकेत नुकतीच एंट्री झाली असून या मालिकेत राजनंदिनीची एंट्री कधी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. शीर्षक गीतात सावलीतून दिसणारा हा चेहरा आता सगळ्यांच्या शेवटी समोर आला. अभिनेत्री शिल्पा तुळसकर ही भूमिका साकारत असून तिचा या मालिकेतील लूक खूपच छान आहे.
सोशल मीडियावरही ‘तुला पाहते रे’ मधील राजनंदिनीची म्हणजेच शिल्पा तुळसकरची जोरदार चर्चा आहे. इतकंच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही राजनंदिनीचं नाव सर्वात जास्त सर्च केलं जात आहे. यावरून राजनंदिनीच्या एन्ट्रीची उत्सुकता आणि मालिकेची लोकप्रियता याचा अंदाज आपण लावू शकतो.
तुला पाहाते रे ही मालिका केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात यांसारख्या राज्यांतही लोकप्रिय आहे. मालिकेच्या टीझरमध्ये राजनंदिनीची झलक पाहायला मिळाली होती. पण आतापर्यंत मालिकेत तिची एण्ट्री झाली नव्हती. मालिकेत तिच्या येण्याने मालिकेची आणखीनच लोकप्रियता वाढली आहे.
मालिकेतील एंट्रीबद्दल बोलताना शिल्पा सांगते, "मला ही माझ्या एंट्रीबद्दल उत्सुकता लागली होती आणि सगळेजण मला विचारात होते. पण जर मी त्यांना सांगितलं असते की, मला ही याबाबत माहिती नव्हतं, तर नक्कीच कोणाचाही यावर विश्वास बसला नसता. मी सुरुवातीचे आणि मधले काही भाग मला जसे जमेल तसे पाहिले आहेत. इशाचा भाग मी जास्त न बघण्याचा प्रयत्न केला, कारण कथानकाला मला नव्याने सामोरं जायचं आहे. त्यामुळे आधीच्या इशाच्या प्रसंगांचा प्रभाव राजनंदिनीच्या प्रसंगांवर नको पडायला म्हणून हा प्रयत्न होता."
सुबोधसोबत पहिल्यांदाच काम करण्याच्या अनुभवाविषयी शिल्पा सांगते, "सुबोध सोबत
मी पहिल्यांदाच काम करतेय आणि तो माझा अत्यंत आवडता नट आहे. तो टॅलेंटेड तर आहेच आणि त्याची शिस्त, त्याची वैचारिकता मी त्याच्या कामातून बघत आली आहे. त्याच्यासोबत काम करण्याची उत्सुकता असण्यापेक्षा त्याला जवळून काम करताना मला बघायचं होतं आणि ती इच्छा तुला पाहते रे या मालिकेमुळे पूर्ण झाली."