तब्बल 15 वर्षांनंतर माथूर कुटुंबीय टीव्हीच्या पडद्यावर परतणार असल्यामुळे पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडणार आहे. ‘हम पाँच’ ही एका मध्यमवर्गीय माथूर कुटुंबाची कथा असून त्यात कुटुंबप्रमुख माथूर, त्यांची दुसरी पत्नी बीना आणि पाच मुली यांच्यातील विलक्षण नातेसंबंधांचे मजेदार चित्रण करण्यात आले आहे. या मुली तर आपल्या वागण्याने माथूर यांना नवनव्या समस्या उभ्या करतातच, पण घरातील भिंतीवर टांगलेल्या त्यांच्या पहिल्या पत्नीच्या फोटोतून त्यांची पहिली पत्नीही कधी कधी माथूर यांच्याशी संवाद साधत असते आणि त्यांना घरातील घटनांवर सल्ला देत असते.
25 वर्षांपूर्वी सर्वप्रथम प्रसारित झालेल्या या मालिकेने काही दर्जेदार अभिनेत्यांना प्रसिध्दीच्या झोतात आणले आणि त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटविला. या मालिकेचे प्रसारण तब्बल 10 वर्षे सुरू होते आणि 2006 मध्ये ती संपुष्टात आली. पण आता खास लोकाग्रहास्तव झी टीव्हीने धमाल विनोदी माथूर कुटुंबियांना पुन्हा एकदा टीव्हच्या पडद्यावर आणले आहे. त्यात आनंद माथूर (अशोक सराफ), बीना माथूर (शोमा आनंद), मीनाक्षी माथूर (वंदना पाठक), राधिका माथूर (अमिता नांगिया आणि नंतर विद्या बालनने ही भूमिका साकारली), स्वीटी माथूर (राखी विजन), काजल माथूर (भैरवी रायचुरा) आणि छोटी (प्रियांका मेहरा) या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या जीवनात पुन्हा हास्याचे रंग भरतील आणि त्यांची दुपार उदासवाणी राहणार नाही.
“सध्या जगभरातील वातवरण हे अनिश्चितता आणि तणावने भरले गेले आहे. अशा काळात प्रेक्षक पुन्हा एकदा हसत्याखेळत्या काळात परतण्याची संधी शोधत असून त्यासाठी टीव्हीवर पूर्वी त्यांना अतिशय भावलेल्या व्यक्तिरेखांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हम पाँच ही लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित करण्याच्या किंवा या कलाकारांकडून ही मालिका नव्या स्वरूपात सादर करण्याच्या सूचना प्रेक्षकांकडून केल्या जात होत्या. काही अतिशय गुणी आणि दर्जेदार कलाकारांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने यातील व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केल्या होत्या.
एखादी मध्यमवर्गीय कुटुंब मनात आणले, तर किती विनोदी बनू शकते, ते या मालिकेतून दिसून येते. 90 आणि 2000 च्या दशकात जे लोक टीव्हीपुढे बसून त्यावरील मालिका पाहात होते, त्यांना हम पाँच ही मालिका जुन्या रंगतदार जमान्याची आठवणी ताज्या होतील. किंबहुना 2020 हे वर्ष या मालिकेचं रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे हा रौप्यमहोत्सव साजरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ही मालिका पुन्हा प्रसारित करून प्रेक्षकांना जुन्या आठवणींचा आनंद पुन्हा उपभोगू देणं हाच आहे. प्रेक्षकांना आज अशा मालिकांचीच खरी गरज आहे.”पूजा ऑण्टीला “आण्टी, मत कहो ना!” असे पुन्हा एकदा म्हणताना पाहण्याची तीव्र उत्सुकता रसिकांना नक्कीच लागली असणार.