Join us

‘आपके आ जाने से’ मालिकेच्या कथानकात झाला हा मोठा बदल, पाहायला मिळणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 7:15 AM

घटस्फोट झालेली वेदिका पुन्हा एकदा साहिल नावाच्याच पण आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या एका मुलाच्या प्रेमात पडते. नव्या जन्मातील या व्यक्तिरेखा पुन्हा एकदा करण आणि सुहासी हेच कलाकार साकारणार आहेत.

मुलापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीबरोबरच्या आगळ्या प्रेमकथेमुळे ‘आपके आ जाने से’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.आता या कथानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून त्यानंतर एक नवी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बडी अम्माच्या सावत्र मुलाकडून हत्या होत असताना साहिल (करण जोटवाणी) आणि वेदिका (सुहासी धामी) हे पुढील जन्मात आपली प्रेमकथा पूर्णत्त्वाला नेण्याची शपथ घेतात आणि अखेरचा श्वास सोडतात. यानंतरचे कथानक हे पुन्हा एकदा वेदिका नावाच्या मुलीभोवती केंद्रित होते. घटस्फोट झालेली वेदिका पुन्हा एकदा साहिल नावाच्याच पण आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या एका मुलाच्या प्रेमात पडते. नव्या जन्मातील या व्यक्तिरेखा पुन्हा एकदा करण आणि सुहासी हेच कलाकार साकारणार आहेत.

कथानकातील या बदलांविषयी करण  जोटवाणी म्हणाला, “ वेळेनुसार मालिकेच्या कथानकात बदल हे होतात, तरी तिचं कथानक पूर्वीचंच कायम राहणार आहे. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडलेली एक घटस्फोटिता आपल्या प्रियकराबरोबर एकत्र राहण्यासाठी आपल्यापुढील सर्व अडचणींवर कशी मात करतात, तेच या नव्या कथानकातही दाखविण्यात आलं आहे. यातील माझी व्यक्तिरेखा प्रेमात वयाचा विचार करत नाही किंवा आपली प्रेयसी घटस्फोटित आहे का? यालाही महत्त्व देत नाही. प्रेमात अशा गोष्टींना महत्त्व देणं मलाही वैयक्तिकरीत्या मान्य नाही. समाजातील अशा काही रूढ संकल्पना मोडीत काढण्याबद्दल ‘आपके आ जाने से’ ही मालिका प्रसिध्द आहे. आता नव्या साहिल आणि वेदिका यांच्या प्रेमकथेवर प्रेक्षकांची कोणती प्रतिक्रिया उमटते, ते पाहण्याची मला उत्सुकता लागली आहे.”

मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना दिसेल की वेदिकाची धाकटी बहीण राधिका हिचे लग्न साहिलशी ठरवण्यात येते; पण वेदिकच्या प्रेमात आकंठ आणि सखोल बुडालेला साहिल त्यास तयार होत नाही. पण वेदिका ही त्याच्यापेक्षा वयाने मोठी असून तिचा नुकताच घटस्फोट झाला असल्यामुळे तिचा साहिलची पत्नी म्हणून स्वीकार करण्यास त्याचे कुटुंबीय तयार नसतात. वेदिका ही साहिलपेक्षा वयाने खूपच मोठी असल्याने तिच्याशी त्याचे लग्न लावून देण्यास साहिलचे कुटुंबीय तयार नसतात. आपल्यापुढील सर्व अडचणींवर मात करून साहिल वेदिकाला आपल्या प्रेमात पाडण्यात कसा यशस्वी होतो, हे पाहणे नक्कीच मनोरंजक ठरेल.