'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' ही एक अनोखी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खूप हसवत, कोपरखळ्या घेत ही 'युवा' मालिका मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यांचा अभिमान राखण्याबाबत एक शिकवण सुद्धा देईल. हलकी फुलकी मनोरंजक अशी ही 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिका १५ जुलैपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे. एक उत्तम अशी कौटुंबिक कथा पाहण्याची संधी या मालिकेमुळे मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांविषयी असणारा जिव्हाळा या मालिकेत पाहायला मिळेल. 'प्रेमासाठी माणूस काहीही करू शकतो' असं म्हणतात. या मालिकेतील नायक प्रेमासाठी मराठीवर प्रभुत्व मिळवताना दिसून येईल.
या मालिकेविषयी बोलताना निर्माते आदेश बांदेकरने सांगितले की, "मालिका 'सुफळ संपूर्ण' होण्यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाची गरज आहे. संपूर्ण टीमवर भरभरून प्रेम करा. प्रत्येकच कुटुंबाला ही कथा आपली वाटेल याची खात्री आम्हाला आहे. आपलं प्रेम आणि आशीर्वाद सदैव सोबत असतील अशी मी अपेक्षा करतो."
उच्च मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील सई केतकर हे या मालिकेतील मुख्य स्त्री पात्र आहे. सई एक साधी, सोज्वळ आणि मनमिळाऊ मुलगी आहे. अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही भूमिका साकारणार आहे. सई ही एका सामान्य मराठी घरातील मुलगी आहे. भारतीय संस्कृती, प्रथा-परंपरा यांचा सन्मान करणं, त्यांचं आचरण करणं तिला आवडतं. मराठी संस्कृतीविषयी तिचं असलेलं प्रेम, ही तिला तिच्या आजोबांकडून मिळालेली देणगी आहे. म्हणूनच, आजोबा तिच्यासाठी आदर्श आहेत. त्यांचे विचार तिला पटतात आणि सगळ्यांनाच पटावेत, त्यानुसार इतरांनी सुद्धा वागावं असं तिला वाटतं. आजोबांप्रमाणेच आजीशीदेखील तिचं फार छान जमतं. ती आजीची सर्वांत लाडकी आहे. आजीआजोबांच्या सहवासामुळेच तिचा स्वभाव फार प्रेमळ व मनमिळाऊ झाला आहे.
कुटुंबाविषयी विशेष आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम तिच्या वागण्यातून दिसून येतं. मराठीतून बी.ए. करतांना 'गोल्ड मेडल' मिळवणारी सई कथ्थक सुद्धा शिकलेली आहे. पण, नाचण्याचा छंद तिने केवळ स्वतःसाठी जोपासलेला आहे. अशी ही गोड मराठी मुलगी १५ जुलै पासून रसिकांच्या भेटीला येणार आहे.