झोंबीवर आधारीत चित्रपट झोंबिवली (Zombivali Movie) काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटातून अभिनेत्री जानकी पाठक (Janaki Pathak) हिने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर आता ती छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती सन मराठी वाहिनीवरील 'माझी माणसं' (Mazi Manasa) या नव्या मालिकेत झळकणार आहे. 'माझी माणसं' या सन मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना येत्या ३० मे पासून दिसणार आहे.
आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या 'गिरीजा'ची ही गोष्ट असून एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स असलेली गिरिजा तिच्या ८ जणांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ती आहे. घरातील सर्वांची काळजी घेत असताना, स्वतःकडे; स्वतःच्या सुखाकडे मात्र ती नेहमीच दुर्लक्ष करते. कुटुंबाचा एकटाच कमवता आधार असल्यामुळे आपल्या भावंडांच्या शिक्षणापासून ते घरखर्च भागवण्याची जबाबदारी सर्वस्वी गिरीजाच पार पाडते. अर्थात या सगळ्या प्रवासात अनेक अडथळे येतात. त्यातून मार्ग काढताना ज्या आपल्या माणसांचा तिला आधार वाटतो, अशी तिला आपली वाटणारी माणसं खरंच तिची आपली आहेत का? ह्या प्रश्नाभोवती मालिका गुंफलेली आहे.
कर्तव्यदक्ष आणि जबाबदार गिरीजाची भूमिका या मालिकेत जानकी पाठक साकारत आहे. स्मिता सरवदे या मालिकेत गिरीजाच्या आईची भूमिका साकारत असून, दिगंबर नाईक मालिकेत गिरीजाचे काका ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. याशिवाय साईंकित कामत, आरती मोरे, भूमिजा पाटील, विजय पाटील, साक्षी महाजन, रोहन पेडणेकर, सोनम म्हसवेकर हे कलाकार सुद्धा या मालिकेत दिसणार आहेत. कोठारे व्हिजन यांची निर्मिती असलेली ही मालिका सन मराठीवर ३० तारखेपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.