साऊथ इंडस्ट्रीतील कलाकारांप्रती चाहत्यांचे प्रेम अनेक स्वरुपात आजवर तुम्ही पाहिले आहे. आपल्या आवडीच्या कलाकाराला एकदातरी भेटावं, त्याच्यासोबत फोटो काढावा आणि त्या आठवणी आयुष्यभरासाठी जपाव्या असे प्रत्येक चाहत्यांला वाटते. अनेकांचे हे स्वप्न साकारही होते. याशिवाय, काहीजण मात्र आवडच्या कलाकारांसाठी चौकटीबाहेर जाऊन काही ना काही करताना दिसतात.
दरम्यान, आंध्र प्रदेशात एका चाहत्याने आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या नावाने एक मंदिर बांधले आहे. साऊथ इंडस्ट्रीतील या अभिनेत्रीच्या नावावर बांधलेले मंदिर आंध्र प्रदेशातील बापटलाजवळ आलापडू गावात आहे. या अभिनेत्रीच्या चाहत्याचे नाव तेनाली संदीप (Tenali Sandeep)असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मंदिराचे काम पूर्ण झाले आहे असून लवकरच हे मंदिर उघडणार आहे.
आंध्र प्रदेशात बांधलेल्या या मंदिराचे नाव दक्षिणेतील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिच्या नावावर असणार आहे. अभिनेत्रीचे सर्व चाहते 28 एप्रिल रोजी या मंदिराच्या अधिकृत उद्घाटनाची वाट पाहत आहेत. समंथाची फॅन फॉलोइंग केवळ साऊथ इंडस्ट्रीपुरती मर्यादित नाही, तर अभिनेत्रीने बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.
विशेष म्हणजे, ज्या चाहत्याने अभिनेत्रीच्या नावावर मंदिर बांधले आहे, तो अद्याप समंथाला भेटलेला नाही. अभिनेत्रीच्या सेवाभावी कार्याने प्रभावित होऊन चाहत्याने तिच्या नावावर मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिच्या नावावर मंदिर बांधले जात असल्याच्या वृत्तावर अद्याप समंथा किंवा तिच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, याधीही अभिनेत्री नयनतारा, हंसिका आणि नमिता यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या नावाने मंदिरे बांधली आहेत. यात आता समंथाचे नाव सामील होत आहे.