शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमाच्या ट्रेलरची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. आज मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची मुख्य भूमिका साकारणारा नवाजुद्दीन सिद्दिकी यांसह अनेक कलाकार आणि राजकीय धुरंदर उपस्थित होते. ठाकरे सिनेमाचा पहिला टीझर काहीच दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला. या चित्रपटाचा टीझर लाँच झाल्यापासूनच ठाकरे सिनेमाची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. या ट्रेलरमध्ये आपल्याला बाबरी मशिद प्रकरणानंतर उसळलेली दंगल पाहायला मिळत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या डोक्यात स्वतंत्र संघटनेचा आलेला विचार आणि त्यानंतरचा शिवसेनेचा झंझावाती प्रवास, बाळासाहेबांचं ज्वलंत हिंदुत्व, मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी, मुंबईत दंगल उसळली असताना त्यांनी दिलेला 'आवाज', कामगारांना दिलेला आधार, बाबरी प्रकरणात त्यांनी दिलेली साक्ष, त्यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या मांसाहेब, जावेद मियांदादला लगावलेला 'षटकार' हे सगळे प्रसंग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळताहेत.
ठाकरे सिनेमा म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याची रसिकांना आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला प्रतीक्षा होती. मात्र, सिनेमाच्या टीझरमधूनच बाळासाहेबांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार असल्याचे स्पष्ट झाले. हुबेहूब बाळासाहेबांची शैली साकारत नवाजुद्दीनने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. बाळासाहेबांसोबतच उद्धव, राज, मनोहर जोशी, शरद पवार यांच्या भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी रसिक आतुर आहेत. बाळासाहेबांच्या भूमिकेनंतर या सिनेमात सगळ्यात मोठी भूमिका दत्ता साळवींची आहे. अभिनेता, लेखक प्रवीण तरडे ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. दरम्यान, 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे.