अजय देवगण (Ajay Devgn), सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि रकुलप्रीत सिंगचा (Rakul Preet Singh) ‘थँक गॉड’ (Thank God ) हा सिनेमा ऑक्टोबरच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण त्याआधीच हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या चित्रपटाने वाद ओढवून घेतला. चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. अभिनेता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्याविरुद्ध जौनपूर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा वाद काय आहे, हे आम्ही तुम्हाला सांगूच पण त्याआधी या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबद्दलची एक मोठी माहिती समोर आली आहे.होय, इंद्रकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘थँक गॉड’चा बजेट 60-70 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. पण ऐकून आश्चर्य वाटेल की, या बजेटची अर्धी रक्कम अजयच्या मानधनावर खर्च झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘थँक गॉड’साठी अजय देवगणने सर्वाधिक मानधन वसूल केलं. या चित्रपटात अजयने चित्रगुप्ताची भूमिका साकारली आहे आणि यासाठी त्याने तब्बल 35 कोटी मानधन घेतलं आहे. म्हणजे सिनेमाचं अर्ध बजेट हे अजयच्या मानधनावरच खर्च झालं. सिद्धार्थ मल्होत्राला या चित्रपटासाठी 7 कोटी मानधन मिळालं आहे तर रकुल प्रीत सिंगने 3 ते 4 कोटी घेतले आहेत.
सर्वांच्या पापांचा व पुण्याचा हिशेब ठेवणा-या ‘चित्रगुप्त’ची भूमिका अजय देवगण यात साकारत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा अयान कपूर नामक तरुणाची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर, रकुल सिंग ही रुही कपूरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात किकू शारदा अयानच्या मित्राच्या, तर सीमा पाहवा अयानच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. नोरा फतेही यात एका आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे.