मुंबई : राजकुमार हिरानी दिग्दर्शित बहुप्रतिक्षीत 'संजू' या सिनेमाचा फक्त संजय दत्त यांचे कुटुंब आणि मित्रांसाठी खासगी स्क्रीनिंगचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या स्क्रीनिंगला संजय दत्तची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरसहसिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. याशिवाय अभिनेता संजय दत्त, त्यांची पत्नी मान्यता, दिग्दर्शक डेव्हिड धवन, विधू विनोद चोप्रा, ओमंग कुमार, नीतू सिंगसह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
या स्क्रीनिंगमध्ये हजर असलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार यावेळी उपस्थितांनी या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद दिला. संजू सिनेमा सुरु झाल्यापासूनच उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेण्यास सुरुवात करतो. सुरुवातीचे पाच मिनिटे तर संजय दत्त आणि रणबीर कपूर हे दोन्ही वेगळे आहेत हे कुणाच्या लक्षातही येत नाही. सिनेमा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. विवेक कौशल आणि जीम सारभ यांनी सिनेमात अफलातून परफॉर्मन्स दिला आहे. याशिवाय मनीषा कोईराला, अनुष्का शर्मा यांनी आपल्या वाट्याला आलेल्या छोट्याशा भूमिकांनाही पूरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिनेता परेश रावल यांनीही आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. मात्र या सगळ्यात भाव खाऊन जातो तो अभिनेता रणबीर कपूरने साकारलेला संजय दत्त. रणबीरने आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सनी साऱ्यांचीच मने जिंकल्याचे यावेळी पाहायला मिळाले. असे समजते म्हणतात की, जेव्हा संजू हा सिनेमा जेव्हा संजय दत्त यांनी पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्यांनाही अश्रू अनावर झाले होते. संजय दत्त यांची पत्नी मान्यता हिला स्क्रीनिंगच्या वेळी स्वत:च्या भावना आवरणे कठीण झाले होते. मान्यताला सिनेमा सुरु असतानाच रडू कोसळले. सिनेमा पाहताना ती अश्रू पुसत असल्याचे पाहायला मिळाले.
याशिवाय दत्त कुटुंबीय, आणि त्यांचे निकटवर्तीय या स्क्रीनिंगला उपस्थित होते. संजय दत्तच्या आजवरील प्रवासात त्याच्या पाठिशी उभ्या राहणा-या बहिण प्रिया दत्तसुद्धा या स्क्रीनिंगला उपस्थित होत्या. या सिनेमातील कलाकारांनी तगडा परफॉर्मन्स दिला आहे. यातील संगीतही सिनेमाच्या कथेला पुढे नेणारे आहे. भारावून गेलेल्या संजय दत्त यांच्या कुटुंबियांनी रणबीर कपूरला मिठी मारत त्याने चित्रपटातील भूमिकेला योग्य न्याय दिल्याबाबत धन्यवाद दिले. चित्रपटाला खूप पसंती देत साडेचार स्टार दिले आहेत, असे सुत्रांनी सांगितले.