Join us

बॉलिवूडच्या या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळाली शिक्षणाची ‘शिदोरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 1:43 PM

आज ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’. भारतात हा दिवस दि. ११ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने कोणत्या चित्रपटातून शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे, ते पाहूयात.

अबोली शेलदरकरआज ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’. भारतात हा दिवस दि. ११ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. आपल्या आयुष्यात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. शिक्षणाचा पाया मजबूत असेल तर आपण जगही जिंकू शकतो. होय, हे खरे आहे. आपणा सर्वांप्रमाणेच आपली आवडती सिनेसृष्टी हिलादेखील शिक्षणाचे महत्त्व आहे. हे आम्ही नाही तर आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवरून म्हणतोय. चला तर मग बघूयात, कोणकोणते आहेत हे चित्रपट ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

हिचकी 

हा चित्रपट २३ मार्च २०१८ यावर्षी प्रदर्शित झाला. अभिनेत्री राणी मुखर्जी हिने या चित्रपटात एका शिक्षिकेची भूमिका साकारलीय. आपल्या कमतरतेलाच आपले बलस्थान बनविणाऱ्या एका मुलीची कथा ‘हिचकी’ या चित्रपटात पाहायला मिळते. तसेच कोणालाही त्यांच्या आर्थिक कुवतीमुळे कमी लेखू नये हा संदेश ‘हिचकी’ चित्रपट देतो. ‘फ्रंट ऑफ द क्लास’ या हॉलिवूडचा रिमेक ‘हिचकी’ हा चित्रपट आहे.

३ इडियट्स 

अभिनेते आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन यांचा हा चित्रपट २५ डिसेंबर २००९ मध्ये प्रदर्शित झाला. इंजिनियरिंगचे शिक्षण घेताना तुम्ही केवळ पुस्तकी किडा न होता वास्तविक जीवनात त्या शिक्षणाचा वापर केला पाहिजे, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आलाय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स तोडले होते. आजच्या दिवशी या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

पाठशाला 

१६ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट शिक्षणव्यवस्था आणि त्यातून करण्यात येणारे शॉर्टकट्स यावर भाष्य करतो. शाळेतील विद्यार्थ्यांवर हा चित्रपट आधारित आहे. यात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आयेशा टाकिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. शाहिद यात एका इंग्रजी आणि संगीत विषयाचा शिक्षक असतो.

तारे जमीं पर 

२००७ राेजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा अभिनेता आमिर खान हा निर्माता, दिग्दर्शकदेखील आहे. हा चित्रपट इशान नावाच्या एका विद्यार्थ्याच्या ‘डिस्लेक्सीक’ या आजारासंदर्भात आहे. इशानची भूमिका दर्शील सफारी याने केली आहे. इशानला शाळेत वाचताना अडथळा येत असतो. त्यामुळे त्याचे आई-वडील त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतात. आमिर खान हा शिक्षक असून, तो इशानला या आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत करतो.

चॉक अँड डस्टर 

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट शिक्षणव्यवस्थेतील झालेल्या कमर्शियलायजेशनवर आधारित आहे. यात जुही चावला, शबाना आझमी, जरीना वहाब, गिरीश कर्नाड आदी कलाकार आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्यावर आधारित हा चित्रपट असून, दिवसेंदिवस त्यांच्यातील हे नाते कसे बदलत जात आहे, यावर हा चित्रपट भाष्य करतो.

टॅग्स :आमिर खानराणी मुखर्जी