भोपाळ - गेल्या काही महिन्यांपासून कायम चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री या ना त्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. मात्र, आत बागेश्वर धाम आणि धीरेंद्र शास्त्री चर्चेत येण्याचे कारण हे सिनेमा आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटावरुन चांगलाच वाद रंगला होता. द केरला स्टोरी हा चित्रपट समर्थन आणि विरोध यामुळे चांगलाच गाजला. आता, वादग्रस्त ठरलेल्या धीरेंद्र शास्त्रींच्या जीवनावर चित्रपट येत आहे. 'द बागेश्वर सरकार' असं या चित्रपटाचं नाव असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख खुद्द धीरेंद्र शास्त्रीच जाहीर करणार आहेत.
हजारो लोकांची गर्दी आणि पाटीवर नाव व व्यक्तीगत माहिती आणि समस्या लिहून देण्याच्या वेगळ्याच प्रथेमुळे बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री चांगलेच चर्चेत आले आहेत. आता, या बाबांवर 'द बागेश्वर सरकार' नावाने चित्रपट काढला जात आहे. या चित्रपटाची कथा नेमकं काय आहे, चित्रपटाचं शुटींग कुठे होईल, यात धीरेंद्र शास्त्रींची भूमिका कोण साकारेल? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी दिली आहेत.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख स्वत: धीरेंद्र शास्त्री हेच जाहीर करतील. हा चित्रपट म्हणजे एका गरीब मुलाचा गुरुदेव बनण्यापर्यंतचा जीवनप्रवास असल्याचं विनोत तिवारी यांनी सांगितलं. ज्या लहान मुलाला लहानपणी एकवेळच्या जेवणाची भ्रांत होती. तो मुलगा, कला, ज्ञान आणि मेहनतीच्या जोरावर आज गुरुदेव या नावाने ओळखला जात आहे. या चित्रपट त्यांच्या याच जीवनसंघर्षाची कहानी असल्याचं तिवारी यांनी सांगितलं.
गेल्या १ वर्षांपासून या चित्रपटासंदर्भात चर्चा आणि काम सुरू आहे. या काळात आम्ही गुरुदेव धीरेंद्र शास्त्री यांच्याशीही अनेकदा संवाद साधला आहे. या पटकथांवर आम्ही रिसर्चही केला. काहीं घटना स्वत: गुरुदेव यांनीच आम्हाला सांगितल्या आहेत. त्यामुळे, अनेक डिटेल्स घटना घेऊन आम्ही काम करत आहोत. १० दिवसांपूर्वीच आम्हाला गुरुदेव यांनी आदेश दिला असून लवकरात लवकर चित्रपट पूर्ण करण्याचे सांगितले. २०२४ च्या डिसेंबपरपर्यंत हा चित्रपट वर्ल्डवाईड रिलीज करण्यात येईल, असेही तिवारी यांनी सांगितले. नॉस्ट्रम एन्टरटेनमेंट हबच्या बॅनरद्वारे ह्या चित्रपटाची निर्मित्ती करण्यात येत आहे.