गेल्या दोन आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या एका हरियाणाच्या गायिकेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला या गायिकेचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्यामुळे सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हरियाणातील प्रसिद्ध गायिका संगीता (Sangeeta) गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता होती. त्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. यामध्येच हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील एका महामार्गाजवळ तिचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या संगीताला ११ मे रोजी तिच्या कुटुंबियांनी तिला शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती.
दोन जणांना घेतलं ताब्यात
संगीता बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३६५ अंतर्गत तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर तिचा शोध सुरु झाला. या शोधमोहिमेमध्ये तिचा मृतदेह २३ मे रोजी आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये संगीताच्या हत्येमागे दोन तरुणांचा हात असल्याचं समोर आलं . त्यानुसार, पोलिसांनी हरियाणातील मेहम येथून दोन तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या दोन्ही तरुणांनी संगीताची हत्या केल्याचा गुन्हा मान्य केला आहे. या दोघांपैकी एकाने तिला दिल्लीतून हरियाणामध्ये आणलं होतं. यावेळी त्याने तिच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळून तिला मारलं. त्यानंतर त्याने साथीदाराच्या मदतीने तिचा मृतदेह मेहम येथे रस्त्याच्या कडेला फेकून दिला.
नेमकं काय आहे प्रकरण?
११ मे नंतर संगीतासोबत कोणताही संपर्क न झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी ३ दिवसांनी पोलिस ठाण्यात तिच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. इतकंच नाही तर तिच्या कुटुंबियांनी संगीताच्या अपहरणाचा आणि हत्येचा आरोप तिच्यासोबत काम करणाऱ्या दोन तरुणांवर केला होता. कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे, ही गायिका एका व्हिडीओ सॉंगच्या शूटिंगसाठी रोहित नावाच्या एका तरुणासोबत भिवानी याठिकाणी गेली होती. त्यानंतर महम या ठिकाणी ती रोहितसोबत एका हॉटेलमध्ये जेवण करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.
दरम्यान, "भैनी भैरो गावाच्या एका ओढ्याजवळ आम्हाला काल एक मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह फारच वाईट अवस्थेत आहे. त्यामुळे या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी हा मृतदेह संगीताचा असल्याचं स्पष्ट झालं'', असं महम पोलीस एसआय विकास यांनी माहिती दिली.