बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी सायंकाळी पुण्यात भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी सूरजसोबत चर्चा केली. यावेळी सूरज चव्हाण याला चांगले मोठे घर बांधून देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
सूरज हा एका गरीब कुटुंबात जन्मलेला तरूण आहे, त्याचे कुटुंब मोठे आहे. आई-वडील लवकर गेल्याने शिक्षण घेता आले नाही. आपल्या ग्रामीण भागातल्या शाळा आपल्याला माहिती आहेत. सूरज शिक्षणाच्या बाबतीत मागे राहिला पण रील्स बनवून तो फेमस झाला. एवढा की त्याला बिग बॉसमधून बोलावणे आले. तो बिनधास्त आहे. त्याच्या स्वभावामुळे तो बऱ्याच जणांना भावला. तो सगळ्यांत मिसळून राहिला, असे अजित पवार म्हणाले.
सूरज माझ्याच गावचा मुलगा आहे. मी त्याची पूर्ण माहिती घेतली आहे. घरकुल योजनेत त्याला घर मिळाले आहे. पण त्याला आता आम्ही चांगल घर बांधून देणार आहोत. त्याच्या हक्काचे घर त्याला देणार, त्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्यात त्याला मदत करणार आहोत. मी रितेशशी देखील बोलणार आहे. मी आलिकडच्या काळात निवडणुकीच्या गडबडीत होतो. पण थोड फार बघत होतो, असे पवार म्हणाले.