आजही समाजात आईचे छत्र हरपलेल्या लहान शिशुना माताचे स्तनपान मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होते. जन्मत:च काही मुलांना कचरा कुंडी अथवा रस्त्यावर टाकले जाते. यामुळे त्यांना स्तनपान मिळत नाही. यासाठीच शासनाने हिरकणी कक्ष प्राथिमक आरोग्य केंद्रात सुरू केले.हाच विषय सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी सावर्डे येथील उद्योजक संजय पाकळे आणि सचिन पाकळे यांनी निर्मिती केलेली आणि गणेश मोडक यांनी दिग्दर्शन केलेल्या “द व्हाईट इटेकएक्सी” या लघुपटाचा शुभारंभ आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये सारा पाकळे हिने कोमल हे पात्र साकारून आयुष्यामध्ये अभिनयाची यशस्वी सुरुवात केली आहे.
समाजातील विशेषतः ग्रामीण भागात शासनाने मातांसाठी स्तनपान करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातून हिरकणी कक्ष सुरू केले आहेत. मात्र, याबाबत विशेष जनजागृती अजूनही झालेली नाही. त्याचे महत्व मोठे असले तरीही आजही समाजातील गैरसमज यामुळे ही संकल्पना पाहिजे तशी सर्वत्र पोहोचली नाही. मात्र, नेमका हाच महत्त्वपूर्ण विषय घेऊन 'संजय- सचिन क्रियेशन'च्या माध्यमातून दिग्दर्शक गणेश मोडक यांनी हा विषय लघुपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या संवेदशील आशयावर आधारित असलेल्या या लघुपटाचे लेखन आशिष निनगुरकर यांनी केले असून संकलन हर्षद वैती व गणेश मोडक यांचे आहे.
या लघुपटात कोमलची संवेदनशील भूमिका बालकलाकर सारा पाकळे हिने साकारली आहे. यात कोमल हिला एक छोटी बहीण असते. मात्र, कोमलच्या आईचे काही आजारामुळे दवाखान्यात निधन होते. तिचे वडीलही तिथून निघून जातात. मात्र, छोटे बाळ म्हणजेच कोमलची छोटी बहिण हिला कोमल घरी आणते. त्यानंतर छोट्या बाळाला दूध मिळवावे यासाठी ती कशी वणवण करते याचे यथार्थ सादरीकरण या लघुपटातून केले आहे. शेवटी एक अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला घेऊन येतो आणि हिरकणी कक्षात एक महिला या छोट्या बाळाला स्तनपान करते आणि मदतीचा हात देते. त्यानंतर कोमलच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंदच म्हणजे “द व्हाईट इटेकएक्सी’ ही लघुपट फिल्म आहे.दिग्दर्शक गणेश मोडक यांनीही या लघुपटाबाबतचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, माता स्तनपान हा विषय आधार नसलेल्या आणि आईचे छत्र नसलेल्या छोट्या बाळांसाठी किती महत्वाचा आहे. यासाठीच शासनाने सुरू केलेल्या ‘हिरकणी कक्षा’ची माहिती या लघुपटातून घराघरात पोहचिवण्याचा मानस असल्याचा त्यांनी सांगितले. 'द व्हाईट इटेकएक्सी' या लघुपटाचे महत्वपूर्ण लेखन आशिष निनगुरकर यांनी केले असून रंगभूषा पुजा पड्याळ तर वेशभुषा रूपेश घरात व रोहन सकट यांनी केली आहे.हा लघुपट इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होणार असून लवकरच ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे