दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या द फॅमिली स्टार या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत येत आहे. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असून विजय सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यामध्येच सध्या वरचेवर त्याच्या रिलेशनशीपची चर्चा रंगत आहे. विजय अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विजयने त्याच्या रिलेशनशीपविषयी भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर तो रश्मिकाऐवजी दुसऱ्याच व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये असल्याचं त्याने म्हटलं आहे.
नुकताच विजयने गलाटा प्लसला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला रिलेशनशीपविषयी प्रश्न विचारण्यात आला. 'विजय कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे का?' असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर, त्याने थोडा वेळ पॉझ घेतला आणि 'हो. मी रिलेशनमध्ये आहे', असं सांगितलं. सोबतच तो कोणासोबत रिलेशनमध्ये आहे हे सुद्धा त्याने सांगितलं.
"मी माझ्या पालकांसोबत, भावासोबत, प्रत्येकासोबत मी रिलेशनशीपमध्ये आहे", असं उत्तर विजयने दिलं. परंतु, त्याने हे उत्तर मुद्दाम फिरवून दिल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. कारण, यापूर्वीच रश्मिकाने केलेल्या एका ट्विटमध्ये तिने त्याचा उल्लेख डार्लिंग म्हणून केला होता.
दरम्यान, विजय देवरकोंडाचा द फॅमिली स्टार हा सिनेमा ५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच दिव्यांशा कौशिक, अजय घोष हे कलाकारही या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा तामिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.