स्टार प्रवाहवर १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. ४ ते १४ वयोगटातील बच्चेकंपनीचे ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर पाहायला मिळणार आहेत. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि हिंदी-मराठी रिऍलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत. लोकप्रिय मराठी गाण्यांसाठी कोरिओग्राफी करणारी फुलवा अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही दिसली आहे. ती उत्तम कथ्थक डान्सर आहे.
मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाविषयी सांगताना फुलवा म्हणाली, ‘महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत जोडली जातेय याचा प्रचंड आनंद आहे. खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा जजची भूमिका पार पाडणार आहे त्यामुळे उत्सुकता आहे. या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे मी हा शो जज तर करणारच आहे पण सोबतच बच्चेकंपनीसोबत दर आठवड्याला परफॉर्मही करणार आहे. त्यामुळे हा शो म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल.
अंकुश चौधरीसोबत माझी खूप जुनी ओळख आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैभव घुगेला पहिल्यांदाच भेटले. या दोघांसोबत काम करताना खूप मजा येतेय. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं या मंचावरचं टॅलेण्ट थक्क करणारं आहे. छोट्या दोस्तांचं नृत्यकौशल्य पाहून थक्क व्हायला होतं. त्यामुळे प्रेक्षकांना हा कार्यक्रम नक्की आवडेल याची खात्री आहे.