Join us

आरारा... जेवण गेलं चोरीला..! गौतमी देशपांडेला ऑनलाइन जेवण ऑर्डर केल्यानंतर आला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:27 PM

Gautami Deshpande : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला ऑनलाइन जेवण ऑर्डर केल्यानंतर धक्कादायक अनुभव आला आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला ऑनलाइन जेवण ऑर्डर केल्यानंतर धक्कादायक अनुभव आला आहे. गौतमीने देखील स्विगी या फूड अॅप्लिकेशनवरून तिरामीसु हे इटालियन डेझर्ट ऑर्डर केले होते. ऑर्डर दिल्यानंतर १ तास उलटल्यानंतरही तिने केलेली ऑर्डर पोहोचली नाही. डिलीव्हरी बॉयशी संपर्क करून तिने आपल्या पार्सलबद्दल चौकशी केली. मात्र ऑर्डर केलेले पार्सल चोरी झाल्याचे त्याने तिला सांगितले. गौतमीने तिला आलेल्या या धक्कादायक अनुभवाबद्दल सोशल मीडियावर सांगितले आहे.

सुरुवातीला गौतमीला त्या डिलीव्हरी बॉयबद्दल शंका आली, तो खोटं बोलत असल्याचे तिला वाटले. त्यामुळे तिने त्याला जाब देखील विचारला. पण नंतर त्याने आपल्या जवळचे पार्सल कसे चोरीला गेले याचा व्हिडीओ गौतमीला पाठवला. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर डिलीव्हरी बॉय खरं बोलत असल्याचे तिच्या लक्षात आले. एका पेट्रोल पंपावर डिलीव्हरी बॉयने आपली गाडी उभी केली होती. गाडीपासून जराशा अंतरावर तो दूर गेलेला या व्हिडिओत पाहायला मिळतो. डिलीव्हरी बॉय दूर गेलेला पाहून गाडीजवळ असलेल्या दोन तरुणांनी स्वीगीच्या बॅग मधून पार्सलची चोरी केली आणि ते पार्सल घेऊन तिथून पळ काढला. 

गौतमीची ऑर्डर देऊ शकत नसल्याचे कारण सांगितले. मात्र या प्रकरणासंबंधी अधिक चौकशी केल्यानंतर पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर पार्सल चोरी झाल्याचे उघड झाले. चोरी करणाऱ्या दोन तरुणांचे चेहरे व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत.चोरी करताना ते दोघेही हसतानाही दिसत आहेत, हे पाहून गौतमीचा राग अनावर झाला. हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. यासोबतच या घटनेबद्दल सविस्तर माहिती देखील दिली आहे. एखाद्याचे जेवण असे चोरणे आणि त्यावर हसणे हे या लोकांसाठी किती लज्जास्पद आहे. असे म्हणत तिने त्या दोघा तरुणांवर आपला संताप व्यक्त केला. स्वीगीला टॅग करून तिने ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. 
टॅग्स :गौतमी देशपांडेस्विगी