२०१५ साली झालेल्या शीना बोरा हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. २५ वर्षीय मुलगी शीना बोराच्या हत्येसाठी INX मीडियाची सीईओ इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. पोटच्याच मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप इंद्राणी मुखर्जीवर आहे. आता या सत्यघटनेवर आधारित एक वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली जाणार आहे.
'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ' असं या वेब सीरिजचं नाव असणार आहे. या सीरिजचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. शीना बोरा हत्याकांडावर भाष्य करणारी ही वेब सीरिज २३ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे चार सीझन असणार आहेत. शीना बोरा हत्याकांडांचं नेमकं सत्य अद्याप समोर आलेलं नाही. ९ वर्षांनंतरही या हत्याकांडामागचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ' या वेब सीरिजमधून शीना बोरा हत्याकांडाचं रहस्य उलगडणार का? हे पाहावं लागेल.
शीना बोरा हत्याकांड काय आहे?
९ वर्षापूर्वी देशभरात गाजलेल्या या प्रकरणावरुन बराच गदारोळ झाला होता. शीना बोरा हिची प्रॉपर्टीच्या हक्कावरुन हत्या करण्यात आली. स्वत:च्या पोटच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप इंद्राणीवर आहे. २०१२ मध्ये झालेल्या हत्येची माहिती २०१५ मध्ये समोर आली. मात्र इतकी वर्ष होऊनही या हत्येची गुंतागुंत अजूनही सुटलेली नाही.