‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमातील बिट्टा कराटे हे पात्र पाहताना अक्षरश: संताप येतो. त्या बिट्टाचा तिरस्कार वाटायला लागतो, त्याचा राग येऊ लागतो. खरं तर प्रेक्षकांच्या या प्रतिक्रिया बिट्टाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं यश आहे. त्याच्या अभिनयाला मिळालेली पावती आहे. यासाठी एकीकडे बिट्टा साकारणाऱ्या अभिनेत्याचं कौतुक होतंय. दुसरीकडे काही लोक त्याला सोशल मीडियावर शिव्या घालत आहेत. एकाचवेळी कौतुक आणि शिव्या झेलणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आहे चिन्मय मांडलेकर. होय, मराठीतील दिग्गज अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने ‘द काश्मिर फाईल्स’ या सिनेमात बिट्टाची भूमिका साकारली आहे.‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत चिन्मयने ‘द काश्मिर फाईल्स’च्या शूटींगदरम्यानचे अनेक किस्से शेअर केलेत. हा चित्रपट कसा मिळाला हेही त्याने सांगितलं.
मला मोठं आश्चर्य वाटलं होतं...मी मराठी आहे. त्यामुळे ‘द काश्मिर फाईल्स’साठी मला विचारणा झाली तेव्हा खरं तर तो माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. मराठी असताना आणि माझ्या अगदी मूडच्या विपरित माझी या चित्रपटासाठी निवड करण्यात आली. अर्थात माझ्या कास्टिंगचं सगळं श्रेय पल्लवी जोशीला जातं. तिने बिट्टाच्या भूमिकेसाठी माझं नाव सुचवलं होतं. मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या जशा प्रतिक्रिया आहेत, तशीच माझी प्रतिक्रिया होती. माझी भूमिका क्रूर आहे हे मला माहित होतं. चित्रपटातून जो काही संदेश द्यायचा होता, त्याआधारावर माझी भूमिका क्रूर असायला हवी होती. माझी निवड झाल्यावर या भूमिकेच्या तयारीसाठी मला वेगवेगळे व्हिडीओ, संदर्भ पाठवण्यात आले होते. त्या व्यक्तिने खुल्लमखुल्ला हत्येची कबुली दिली होती. त्याच्या त्यावेळच्या मानसिकतेपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न होता, असं चिन्मयने सांगितलं.
लोक मला खूप शिव्या घालत आहेत पण... ‘द काश्मिर फाईल्स’मध्ये मी साकारलेली बिट्टाची भूमिका पाहून लोक मला शिव्या घालत आहेत. अनेक जण मला मॅसेज करून माझ्या भूमिकेचा तिरस्कार वाटतोय, असं सांगत माझ्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर लोक आपली भडास काढत आहेत आणि मी लोकांमधील तो राग जागृत करू शकलो याचा मला आनंद आहे. लोक माझा द्वेष करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, असं चिन्मय म्हणाला.