The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihori) यांनी काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाद्वारे काश्मीरी पंडितांवर झालेले अत्याचार दाखवले आहेत. या चित्रपटात पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी राधिका मेमनची निगेटिव्ह भूमिका साकारली आहे. पल्लवी जोशी या विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी असून या चित्रपटाच्या पहिल्याच दिवसापासून ते एकत्र काम करत आहे. नुकतीच दिल्लीत एक पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी चित्रपटासाठी रिसर्च करताना समोर आलेले धक्कादायक किस्से सर्वांसोबत शेअर केले.
पल्लवी जोशी यांनी चार वर्ष या चित्रपटासाठी रिसर्च केला आणि अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी ज्या कुटुंबावर अत्याचार झाला होता त्यांच्याशीबी पल्लवी जोशींनी संवाद साधला. "आम्ही जेव्हा पहिली मुलाखत घेण्यासाठी गेलो तेव्हा ज्यांच्याशी आम्ही संवाद साधण्यासाठी जात आहोत, त्यांच्या वडिलांचा खून झाला होता याची आम्हाला कल्पना होती. परंतु तो कसा झाला याबाबत आम्हाला माहिती नव्हती. जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो, तेव्हा त्या कुटुंबीयांनी आमचं स्वागतही केलं," असं पल्लवी जोशी म्हणाल्या.
"त्यानंतर त्यांनी आपल्या बालपणापासून काय अत्याचार झाले याबद्दल सांगितलं. आपल्या वडिलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे ५० तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर गोणीत भरून ते फेकण्यात आले. २-३ दिवसांनी जेव्हा ते पोतं सापडलं, तेव्हा वडिलांच्या आयडी कार्डवरून त्यांची ओळख पटवण्यात आली, असं त्यांच्या मुलीनं सांगितलं," असं पल्लवी जोशी यांनी सांगितलं.
'शवविच्छेदनानंतरही शरिराच्या आतले भाग दिसत होते'"एका आणखी मुलाखतीत एका महिलेनं सांगितलं की त्यांच्या वडिलांना संपूर्ण शरिरात गोळ्या मारण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांची गाडी आली आणि त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन गेली. जेव्हा त्यांचा मृतदेह परत आणला तेव्हा सर्वच ठिकाणी गोळ्या लागलेल्या दिसत होत्या. शवविच्छेदनानंतर टाकेही नीट घालण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या शरिराचे आतील भागही दिसत होते. आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना आपल्याला आंघोळ घालावी लागली हे सांगताना त्यांच्या अश्रूचा बांध फुटला," असंही पल्लवी जोशी यांनी आणखी एका मुलाखतीबाबत सांगताना म्हटलं.
"शब्दच नव्हते""आम्ही दररोज असं ३-४ जणांकडून ऐकत होतो. आमच्याकडे बोलण्यासाठी शब्दही नव्हते. मला पुढे मुलाखत घेणंही शक्य नव्हतं आणि एक वेळ अशी आली की मी मागे हटण्यासाठीही तयार झाले. ती कुटुंब आजही त्या आठवणीसंह जगतायत हे ऐकवत नव्हतं. आजपर्यंत त्या गुन्हेगारांना शिक्षाच मिळाली नाही," असंही त्या म्हणाल्या.