काही दिवसांपूर्वी 'द केरळ स्टोरी' (the kerala story) फेम अदा शर्मा (adah sharma) हिला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. इतकंच नाही तर तिचा मोठा अपघातही झाला. त्यानंतर आता या सिनेमातील आणखी एका अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याविषयी या अभिनेत्रीने स्वत: खुलासा केला आहे.
द केरळ स्टोरीफेम अभिनेत्री सोनिया बालानी (sonia balani)हिला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या सिनेमात तिने आसिफा ही भूमिका साकारली आहे. सोनियाने कॅमेरासमोर येऊन तिला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचं सांगितलं.
"ही भूमिका साकारल्यानंतर मला अनेक धमक्या मिळाल्या. आता तुझी खैर नाही, असं कोणी मला म्हणायचं. तर, काही जणांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. मला धमक्या येतायेत ही मोठी गोष्ट नाहीये. मी अशा ७ हजार मुलींना भेटले आहे ज्यांचं धर्मपरिवर्तन करण्यात आलं आहे. आणि, त्या सगळ्या मुली आता आश्रमात राहतात", असं सोनियाने सांगितलं.
पुढे ती म्हणते, "अशा प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या अनेक कलाकारांना आतापर्यंत अशा धमक्या आल्या आहेत. त्यामुळे ही फार मोठी गोष्ट नाहीये. खऱ्या आयुष्यात मी आसिफापेक्षा फार वेगळी आहे. मला आधी निगेटिव्ह भूमिका करायच्या नव्हत्या. पण, या भूमिका चॅलेंजिंग आहेत."