'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित हा सिनेमा लव्हजिहादवर आधारित आहे. तर अभिनेत्री अदा शर्माने (Adah Sharma) सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक होताना दिसतंय. दरम्यान काल रविवारी अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा अपघात झाला. मात्र काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती त्यांनी ट्वीट करुन दिली आहे.
अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन काल तेलंगणामधील करीमनगर येथे हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जाणार होते. मात्र रस्त्यातच त्यांच्या टीमचा अपघात झाला. टीममधील काही जणांना रुग्णालयात अॅडमिट करावे लागले. अदा शर्माने ट्वीट करत लिहिले,"आम्ही ठिक आहोत. आमच्या अपघाताची बातमी पसरल्याने बरेच मेसेज आले. आमची संपूर्ण टीम ठीक आहे काही गंभीर नाही, तुमच्या काळजीसाठी धन्यवाद."
तर सुदिप्तो सेन यांनीही ट्वीट करत लिहिले, "आमच्या सिनेमाबद्दल माहिती देण्यासाठी आज करीमनगर येथे युथ गॅदरिंगमध्ये सहभागी होणार होतो. पण काही समस्या आल्या आणि आम्हाला जाता आलं नाही. करीमनगरच्या रहिवाश्यांची मनापासून माफी मागतो. आपल्या मुलींना वाचवण्यासाठी आम्ही ही फिल्म बनवली. आम्हाला असाच पाठिंबा देत राहा."
'द केरळ स्टोरी' सिनेमाने 100 कोटी पार केले आहे. केवळ 9 दिवसात चित्रपटाने 112.99 कोटींचा गल्ला जमवला आहे. काही ठिकाणी सिनेमाला प्रचंड पाठिंबा मिळतोय तर पश्चिम बंगाल, तमिळनाडू सारख्या राज्यात बंदी घालण्यात आली आहे.