Shabana Azmi On The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरुन देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्षांनी आणि इतर संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण, अखेर शुक्रवारी(दि.5) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला आहे. पण, अजूनही काही जण चित्रपटाला विरोध करत आहेत. या सगळ्या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) 'द केरळ स्टोरी'च्या समर्थनार्थ समोर आल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना 'द केरळ स्टोरी'च्या समर्थनार्थ पुढे आल्या, त्यांनी चित्रपटाच्या समर्थनार्थ एक ट्विट केले. त्या म्हणाल्या की, "जे लोक द केरळ स्टोरीवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, ते आमिर खानच्या लाल सिंग चड्ढावर बंदी घालू पाहणाऱ्यांइतकेच चुकीचे आहेत. चित्रपटाला सेंसॉरकडून प्रदर्शनाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याचा अधिकार कुणालाही नाही," असे त्या म्हणाल्या.
काय आहे चित्रपटाचा वाद'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून तो वादात सापडला आहे. ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला की, केरळमधील 32,000 मुली बेपत्ता झाल्या आणि नंतर त्या दहशतवादी गट ISIS मध्ये सामील झाल्या. यानंतर हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आणि बराच गदारोळ झाला. चित्रपटाच्या ट्रेलरमधील आकडे अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. वाढता वाद पाहून नंतर निर्मात्यांनी हा आकडा मागे घेतला आणि तीन महिलांची कथा असल्याचे सांगितले.