मराठमोळा अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. शशांक लोकप्रिय अभिनेता आहेच याशिवाय तो समाजातील वाईट गोष्टींवरही टीकाटिप्पणी करताना दिसतो. शशांक केतकर अनेकदा आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छता, वाईट गोष्टींवर बोट ठेऊन त्याविरोधात आवाज उठवताना दिसतो. शशांकने काही दिवसांपूर्वी मालाड, मालवणी भागातील अस्वच्छतेबद्दल असाच आवाज उठवला होता. याची दखल महानगरपालिकेने घेतली असून शशांकने BMC चे आभार मानले आहेत.
शशांकची तक्रार काय होती?
शशांक केतकरने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करुन मालाड वेस्टला मालवणी पोलिस स्टेशन आणि चर्च यांच्यामध्ये असलेल्या भागाची काय अवस्था असते हे त्याने दाखवलं होतं. "सकाळचं चित्र वेगळं तर रात्रीचं चित्र पूर्ण वेगळं दिसतं. तो भाग कचऱ्याने भरलेला असतो. तिथेच अनेक गायी चरायला येतात. बाजूला बदाक शेकची गाडीही आहे. अशा ठिकाणाहून नागरिक प्रवास करतात तर काहींची तिथे वस्तीही आहे." असं शशांक म्हणाला होता. अपुऱ्या कचरापेटींमुळे कचरा बाहेर सांडतो. त्यामुळे जास्तीच्या कचरापेटी BMC ने द्याव्यात, अशी मागणी शशांकने केली होती.
शशांकने मानले BMC चे आभार
शशांकच्या व्हिडीओची आणि मागणीची BMC ने लगोलग दखल घेतल्याचं दिसतंय. शशांकने याविषयी BMC चे आभारही मानले आहेत. शशांक लिहितो, "A big thumbs up to @my_bmc ! मी तक्रारीचा video टाकला आणि तुम्ही लगेच action घेतलीत. मला कल्पना आहे, सुधारणेला अजून खूप वाव आहे पण हेही नसे थोडके!सगळे मिळून करू की स्वच्छ भारताचा विचार. अशक्य नाहीये." शशांकचं या गोष्टीमुळे सोशल मीडियावर चांगलंच कौतुक आहे.