आज दसरा. भारतातील अनेक ठिकाणी आज उत्साहात दसरा आणि विजयादशमीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जातोय. अनेकांच्या घरी सरस्वतीचं पूजन करुन एकमेकांना सोनं देऊन उत्साहात दसरा साजरा केला जात असेल यात शंका नाही. दसऱ्यानिमित्त तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे. भारतीय मनोरंजनविश्वातील असा एकमेव अभिनेता ज्याने रुपेरी पडद्यावर श्रीराम आणि रावण या दोघांचीही भूमिका साकारली. कोण आहे तो कलाकार?
या अभिनेत्याने साकारलेले श्रीराम आणि रावण
श्रीराम आणि रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे एन टी रामा राव. त्यांचं पूर्ण नाव नंदमुरी तारका रामाराव असं आहे. नंदमुरी हे RRR फेम सुप्रसिद्ध अभिनेता ज्यु. एनटीआरचे आजोबा आहेत. एनटी रामा नाव (NTR) हे असे एकमेव अभिनेते होते ज्यांनी एकाच वेळी त्यांच्या कारकीर्दीत रुपेरी पडद्यावर लंकेश रावण आणि प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली होती. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार १९५८ साली रिलीज झालेल्या 'भूकैलास' सिनेमात त्यांनी रावणाच्या भूमिकेत छाप सोडली होती.
या सिनेमात NTR यांनी साकारलेले प्रभू श्रीराम
यानंतर १९६१ साली रिलीज झालेल्या 'सीता रामा कल्याणम' सिनेमात त्यांनी पुन्हा एकदा रावणाची भूमिका साकारली होती. याशिवाय १९६३ साली रिलीज झालेल्या 'लव कुश' सिनेमात त्यांनी श्रीरामांची भूमिका साकारली होती. पौराणिक भूमिका करण्यासाठी NTR लोकप्रिय होते. त्यांनी तब्बल १५ हून अधिक सिनेमांमध्ये श्रीकृष्णाची भूमिकाही रंगवली होती. NTR यांचं हैदराबादमध्ये असलेलं घर लोक तीर्थक्षेत्र मानायचे. ७० च्या दशकात त्यांच्या नावाने आंध्र प्रदेशमध्ये अनेक मंदिरांची स्थापना झाली होती. या मंदिरात त्यांनी साकारलेल्या श्रीराम आणि कृष्णाची मूर्ती प्रतिकृती म्हणून ठेवली गेली होती. आज त्यांचा नातू अर्थात Jr. NTR सुद्धा भारतीय मनोरंजनविश्व गाजवत आहे.