नेटफ्लिक्सवरील 'द रेल्वे मैन' ही सीरिज गेल्या ३ महिन्यांपासून लोकप्रियतेच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. या सीरिजमधून भोपाळमध्ये झालेल्या वायू गळतीवर भाष्य करण्यात आलं आहे. या दुर्घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत नागारिकांच्या मदतीला धावून गेलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वीरतेची गाथा यातून मांडण्यात आली आहे. १८ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजचे चार भाग आहेत. पण, ही गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडणं तितकं सोपं नव्हतं. भोपाळमधील त्या रात्रीचा एकही फोटो किंवा व्हिडिओ नसल्याने हे एक मोठं आव्हान असल्याचं दिग्दर्शक शिव रवैल यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "भोपाळमध्ये प्राणघातक वायूची गळती झाली त्या रात्रीचा कोणताहा फोटो किंवा फुटेज नव्हते. भोपाळमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही शोकांतिका किती भयंकर होती, हे लोकांना दाखवण्यासाठी सीरीज मध्ये चित्रित केलेली प्रत्येक गोष्ट पुन्हा तयार करावी लागली आणि पुन्हा कल्पना करावी लागली. आम्ही संशोधन करत असताना आम्हाला समजले की रात्रीची कोणतीही इमेज किंवा फुटेज नाही. म्हणून, सर्वकाही आम्हाला पुन्हा तयार करावे लागले. आम्हाला ते तुमच्यासाठी विश्वासार्ह बनवायचे होते.आम्ही १३०-१४० पानांची चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. पण फिचर फिल्म बनवण्यासाठी बरेच घटक काढून टाकावे लागणार होते.”