Join us

तीच गाडी, तोच रुबाब; ठाण्यात देवीच्या आरतीसाठी अचानक आले 'आनंद दिघे'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 11:53 AM

शिवसेनेचे दिवंगत नेते आणि ठाण्यातील जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

ठाणे - आनंद दिघे आणि ठाण्याचं एक वेगळंच नातं आहे, ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीच्या उत्सवाची सुरुवातही त्यांनी केली. त्यामुळे, नवरात्रीत येथील देवी उत्सवात त्यांच्या आठवणी दरवर्षी जागवल्या जातात. याच परिसरात त्यांचा आनंद आश्रम असून आजही ठाणेकरांना तेथून आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा मिळतो. मात्र, नवरात्री उत्सवात टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी अचानक आनंद दिघे आले अन् त्यांना पाहायला गर्दी झाली. होय, हे आनंद दिघे म्हणजे ७० मिमिच्या पडद्यावर झळकलेला अभिनेता प्रसाद ओक. प्रसाद ओक आनंद दिघेंच्या रुपात ठाण्यात आला होता. 

शिवसेनेचे दिवंगत नेते आणि ठाण्यातील जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली. आनंद दिघेंच्या या भूमिकेला प्रसादने पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी प्रसाद ओकच्या या भूमिकेत आनंद दिघेंचा साक्षात्कार झाल्याचं म्हटलं. प्रसादचं या भूमिकेसाठी कौतुकही झालं. आता, 'धर्मवीर भाग २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चिञपटाच्या चिञीकरणाची सुरवात रविवारपासून ठाण्यात करण्यात आली. त्यासाठीच, आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओक अवतरला होता. 

ठाण्यातील टेंभीनाका येथील नवराञोत्सवात आनंद दिघे अष्टमीला आरती करायचे. हा सीन धर्मवीर २ सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका करणार्‍या कलाकार प्रसाद ओक व इतर कलाकारांच्या उपस्थितीत शूट करण्यात आला. यावेळी दिघे यांच्या भूमिकेतील प्रसाद ओकला पाहून उपस्थित देवी भक्तांना प्रत्यक्षात दिघेसाहेबच देवीच्या आरतीला आल्याचा भास झाला. दरम्यान, आनंद दिघेंचा तोच लूक, तीच आरमाडा गाडी आणि तोच रुबाब... प्रसाद ओकमध्ये दिसून येत होता. त्यामुळे, प्रसाद ओकला पाहण्यासाठी अनेकांनी टेंभीनाका येथील देवीच्या उत्सव मंडपात गर्दी केली होती. 

यापूर्वीही संगीत प्रकाशन सोहळ्यात एंट्री

दरम्यान, यापूर्वी ‘धर्मवीर’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला होता. त्यावेळीही अभिनेता प्रसाद ओक ‘आनंद दिघे’ यांच्या लूकमध्ये सर्वांसमोर हजर झाला आणि मंचावर साक्षात दिघे साहेबच आले, असा भास उपस्थित असलेल्या सर्वांनाच झाला. या सोहळ्याला आनंद दिघेंच्या बहिण अरुणाताईसुद्धा उपस्थित होत्या. प्रसादला या रुपात बघून त्या थक्क झाल्या. प्रसादला समोर बघून त्यांना अक्षरशः गहिवरून आलं होतं, त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. आज माझा भाऊ मला परत भेटला, असं त्या म्हणाल्या आणि उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत पाणी तरळले होते. 

टॅग्स :सिनेमाठाणेप्रसाद ओक नवरात्री