झी मराठी वाहिनीवर लवकरच येत आहे, लोकमान्य ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान शाळकरी वयात असल्यापासून आपल्या अंगी भिनलेला आहे. लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास आपल्याला तोंडपाठ आहे. त्यांच्या प्रभावी कृतीतून त्यांनी घालून दिलेला एकत्र येण्याचा वसा आपण आजही जपतो आहोत. झी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर ही नवीकोरी मालिका सुरु होणार आहे.
त्यानिमित्त झी मराठीवरनं मुंबईतील लोकमान्य टिळक समाधी स्थळ, गिरगाव येथील चौपाटीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पगडी आणि नावाचे मिळून एक सुंदर वाळूशिल्प साकारण्यात आलं होतं. हे वाळूशिल्प चौपाटीवर संध्याकाळी फेरफटका मारायला येणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. वाळूशिल्प सर्वांना पाहण्यासाठी एक आठवडा खुलं राहणार आहे.
तर स्पृहा जोशीने या आधी झी मराठीवरील 'उंच माझा झोका' मालिकेतील रमाबाई रानडे यांची भूमिका अजरामर करून ठेवली आहे. तिला आता पुन्हा ऐतिहासिक भूमिकेत पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. लोकमान्य ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री साडे नऊ वाजता प्रसारीत होणार आहे.