शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवरील (Indrani Mukerjea) माहितीपट नेटफ्लिक्सवर प्रसारित होऊ न देण्यासाठी सीबीआयने केलेला अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला होता. यानंतर सीबीआयने याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज प्रदर्शित होणाऱ्या 'द इंद्राणी मुखर्जी' (The Indrani Mukherjee) माहितीपटाचं प्रदर्शन उच्च न्यायालयाने थांबवलं आहे. उद्या हा माहितीपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. मात्र आता न्यायालयाने नेटफ्लिक्सला दणका दिला आहे.
शीना बोरा हत्येप्रकरणाचा खटला अद्याप पूर्ण न झाल्याने इंद्राणी मुखर्जीवरील हा माहितीपट प्रसारित केला जाऊ शकत नाही, असे सीबीआयचे म्हणणे होते. इंद्राणी आणि या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींनी या सिरीजमध्ये आपले मत मांडू नये, त्यापासून त्यांना अडवावे अशी मागणीही सीबीआयने न्यायालयाकडे केली होती. सीबीआयचा युक्तिवाद उच्च न्यायालयाने मान्य करत प्रदर्शन थांबवलं आहे. हायकोर्टाने आम्ही निर्देश देण्याआधीच तुम्ही प्रदर्शन रोखा असंही सांगितलं. न्यायमूर्ती रेवती मोहिते, मंजुषा देशपांडे, सीबीआयचे वकील आणि तपासअधिकारी यांच्यासाठी नेटफ्लिक्स माहितीपटाची विशेष स्क्रीनिंग करणार आहे. ही स्क्रीनिंग सोमवार ते बुधवार मध्ये कधीही होईल. यानंतर गुरुवारी याची पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता आठवडाभर तरी माहितीपट रिलीज होऊ शकणार नसून न्यायालयाने नेटफ्लिक्सला एकप्रकारे दणकाच दिला आहे.
शीना बोरा हत्येप्रकरणी सीबीआयने २०१५ मध्ये इंद्राणीला अटक केली. नोव्हेंबर २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्याने इंद्राणीने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने मे २०२२ मध्ये तिची जामिनावर सुटका केली.