Join us

"रायगडावर गेल्यानंतर घोड्यांचे आवाज आले अन्...", अभिनेत्याने सांगितला 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार'चा अनुभव

By कोमल खांबे | Updated: March 3, 2025 13:42 IST

'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' या वेब सीरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत असून त्याने शिलेदाराच्या वंशाजाची भूमिका बजावली आहे. या निमित्ताने राजीव खंडेलवालने 'लोकमत फिल्मी'शी खास गप्पा मारल्या. 

>> कोमल खांबे

'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' ही वेब सीरिज सध्या ओटीटीवर गाजत आहे. डॉ. प्रकाश कोयंडे यांच्या 'प्रतिपाश्चंद्र' या कादंबरीवर आधारित या वेब सीरिजची कथा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खजिनाच्या शोधात असलेल्या आणि त्या खजिन्याचं संरक्षण करणाऱ्या एका शिलेदाराची ही कथा आहे. यामध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत असून त्याने शिलेदाराच्या वंशाजाची भूमिका बजावली आहे. या निमित्ताने राजीव खंडेलवालने 'लोकमत फिल्मी'शी खास गप्पा मारल्या. 

'सिक्रेट्स ऑफ शिलेदार'मध्ये तू एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहेस, या अनुभवाबद्दल काय सांगशील? 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या खजिनाच्या शोधात निघालेल्या एका शिलेदाराच्या वंशजाची ही कथा आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. कारण, या जॉनरचा जास्त कंटेट आपल्याकडे बनलेला नाही. त्यामुळे माझ्यासाठीही हा एक नवा अनुभव होता. ट्रेजर हंटसारखी ही स्टोरी असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी शूट करावं लागलं. एकत्र कुटुंबासोबत किंवा लहान मुलांसोबत बसून बघता येईल अशी ही वेब सीरिज आहे. ज्यामध्ये इतिहासही दाखवला गेला आहे. ओटीटीवर असा कंटेटही खूप चालू शकता.

या वेब सीरिजमध्ये अनेक ऐतिहासिक जागा दाखवल्या गेल्या आहेत. कोणत्या ठिकाणी या वेब सीरिजचं शूटिंग झालं आहे? 

या वेब सीरिजच्या निमित्ताने अनेक ऐतिहासिक जागांवर शूट करायला मिळालं. एक अभिनेता असल्यामुळे कामाच्या व्यस्त शेड्युलमधून किंवा सहज अशा ठिकाणी फार कमी होतं. पण, शूटिंगच्या निमित्ताने कर्नाटकातील बदामी येथे आम्ही शूट केलं. रायगड किल्ला, बारामती येथे आम्ही शूट केलं. खजिना शोधताना असं होतं की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना सापडला तर...दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या ऐतिहासिक वास्तू पाहून तुम्ही अचंबित होऊन जाता.  बादामी केव्ह्सवर गेल्यानंतर ते शिल्प ७००-८०० वर्षांपूर्वी बनवलं असेल यावर विश्वास बसत नाही. 

रायगडावरही वेब सीरिजमधील काही भाग शूट करण्यात आला आहे? हा अनुभव कसा होता?  

रायगडावर जेव्हा मी शूटिंगसाठी गेलो. तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की एवढ्या उंचावर हा किल्ला कसा बांधला गेला असेल? आणि त्याकाळी तिथे माणसं राहत होती. मी याआधी कधी रायगडला गेलो नव्हतो. मी तर रोपवेने रायगडावरला गेलो. पण, तिथे गेल्यानंतर कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांना योद्धा का म्हटलं जात असेल. कारण, त्यांना दूरदृष्टी होती. रायगडावर गेल्यानंतर वेगळीच ऊर्जा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ गेल्यानंतर डोळे बंद केल्यावर मला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. हा वेगळाच अनुभव होता. 

या वेब सीरिजमध्ये तू एका शिलेदाराच्या भूमिकेत आहेस. खऱ्या आयुष्यात जर तू शिलेदार किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असतास तर कोणती गोष्ट बदलली असतीस?

जर माझ्या हातात खरंच काही असतं तर मी युद्ध बंद केलं असतं. कारण, त्यामुळे काहीच निष्पन्न होत नाही. इतिहासात मला या गोष्टी बदलायला आवडल्या असत्या. जमिनींवर ताबा मिळवून किंवा रक्ताचे पाट वाहून काहीही साध्य होणार नाही. पण, मला वाटतं या गोष्टी पुढेही सुरू राहतील. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना खऱ्या आयुष्यात मिळाला तर काय करशील? 

जर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना खऱ्या आयुष्यात मिळाला तर मी तेच करेन जे महाराजांना हवं होतं. मला वाटतं हा खजिना त्यांनी त्यांच्या प्रजेसाठी ठेवला असावा. त्यांच्या विकासासाठी महाराजांनी तो खजिना ठेवला असावा. त्यामुळे जर मला खजिना मिळालाच तर मी त्याच गोष्टीसाठी तो खर्च करेन ज्यासाठी महाराजांनी तो ठेवला होता. त्यामुळे तो खजिना त्यांच्या प्रजेमध्ये वाटून टाकेन. 

सई ताम्हणकरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? 

सईला मी या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच भेटलो. मी तिला आधीपासून ओळखत होतो. पण, आमची कधी भेट झाली नव्हती. लूक टेस्टच्या वेळी सईच माझ्या मेकअपरुममध्ये येऊन मला "हॅलो राजीव भाई..." असं म्हणाली होती. तेव्हापासूनच आमच्यात मैत्री झाली होती. सईची सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की तिचा कामावर फोकस आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करताना मला मजा आली. 

छावा सिनेमा पाहिलास का?

छावा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही. पण, विकी कौशल एक चांगला अभिनेता आहे. आणि लक्ष्मण उतेकर उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. त्यामुळे मलाही सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे. पण, काही दिवसांपूर्वीच मला जीममध्ये थोडी दुखापत झाली. ज्यामुळे मी सध्या आराम करत आहे. मी बरा झालो की नक्की हा सिनेमा पाहणार आहे. 

टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि सिनेमांमध्ये तू काम केलं आहेस. सगळ्यात जास्त तू कुठे रमतोस? आणि या २० वर्षांत इंडस्ट्रीमध्ये काय बदल जाणवतो? 

मी काम करताना माध्यम पाहत नाही. अभिनय करणं हे माझं काम आहे. आणि त्यामुळे मी ते करत राहीन. जर मी माध्यमांचा विचार केला तर मग मला बंधनं येतील. मी ज्या माध्यमात काम करेन मग सिनेमा असो वेब सीरिज किंवा मालिका तिथे लोकांनी मला बघणं पसंत करावं, असं मी म्हणेन. अभिनयावर माझं घर चालतं. त्यामुळे मी कोणत्याही माध्यमात काम करत राहीन. एका अभिनेत्याने सर्वच माध्यमात काम केलं पाहिजे, असं मला वाटतं. गेल्या २० वर्षात इंडस्ट्री खूप बदलली आहे. पण, एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे जर तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्ही आता ते सहजरित्या दाखवू शकता. पहिलं सगळ्यांना संधी मिळत नव्हती. पण, आता तुम्ही छोट्या शहरातील असाल तरी सहजपणे सगळ्यांपर्यंत पोहोचू शकता. 

तुझी पत्नी मराठी आहे. तिच्यासोबत मराठी सिनेमे पाहतोस का? मराठी सिनेमात काम करायची संधी मिळाली तर? 

कधी कधी मी पत्नीसोबत मराठी चित्रपट बघतो. मी सैराट, बाईपण भारी देवा, नटसम्राट, हरिचंद्राची फॅक्टरी हे सिनेमे पाहिले आहेत. माझ्या सासू सासऱ्यांना मराठी सिनेमे पाहणं आवडतं. त्यामुळे मग मीदेखील बघतो. या सगळ्यात मला नटसम्राट हा सिनेमा खूप चांगला वाटला. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांनी कसोटीचा अभिनय केला आहे. मराठी सिनेमात काम करायलाही मला आवडेल. माझं मराठी तितकं चांगलं नाही पण मी नक्कीच शिकून घेईन.  

टॅग्स :राजीव खंडेलवालटिव्ही कलाकारसई ताम्हणकर