बॉलिवूड अभिनेता सलमान खान(Salman Khan)चा 'बजरंगी भाईजान' (Bajrangi Bhaijaan) चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात सलमान खानसोबतहर्षाली मल्होत्रा मुख्य भूमिकेत होती, जिने या चित्रपटात मुन्नी उर्फ शाहिदाची भूमिका केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ७ वर्षे झाली आहे.काही महिन्यांपूर्वी सलमान खानने या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. 'बजरंगी भाईजान २' ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, यावेळीही 'मुन्नी' ही व्यक्तिरेखा या चित्रपटात दिसणार का? अशा परिस्थितीत आता हर्षाली मल्होत्रा(Harshali Malhotra)ने स्वतः चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत मौन सोडले आहे.
हर्षाली मल्होत्राने कबीर खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. शूटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी सलमान खानच्या कॉलची ती वाट पाहत असल्याचे हर्षालीने सांगितले. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना हर्षाली म्हणाली, 'मी सुपर-डुपर एक्सायटेड आहे. आता मला आशा आहे की सलमान अंकल फोन करतील आणि सांगतील की आपण चित्रपटाची तयारी सुरू करणार आहोत आणि मी लगेचच चित्रपटाला हो म्हणेन. घोषणा झाल्यापासून बरेच लोक मला सोशल मीडियावर टॅग करत आहेत आणि त्यांना या प्रोजेक्टबद्दल जाणून घ्यायचे आहे. हा चित्रपट कधी सुरू होईल याची मी वाट पाहत आहे आणि मला आशा आहे की त्यात मला भूमिका मिळेल.
केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनी पुष्टी केली की ते मे महिन्याच्या आसपास बजरंगी भाईजानच्या सिक्वेलसाठी स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात करणार आहेत. सीक्वेलचे नाव पवन पुत्र भाईजान असणार आहे. केव्ही विजयेंद्र प्रसाद 'RRR', 'बाहुबली सीरीज' आणि 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' लिहिण्यासाठी ओळखले जातात.