झी मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका दाखल झाली आहे ‘सावळ्याची जणू सावली’. या मालिकेची कथा आहे सावली या आळंदी मध्ये राहणाऱ्या, रंग रूपाने साधारण पण गुणांनी असाधारण असणाऱ्या मुलीची. सावलीला दैवी सुरांची देणगी लाभलेली आहे. स्वभावाने प्रेमळ असलेली सावली दिलेल्या शब्दाला जागणारी आहे. वडील एकनाथ आणि आई कान्हू यांच्याप्रमाणेच सावलीचीही पांडुरंगावर अपार श्रद्धा आहे. तिच्या आयुष्यात त्याचं स्थान अनन्यसाधारण असच आहे. त्यामागे तेवढंच खास कारणही आहे. सावलीचा जन्म झाला तेव्हा ती श्वास घेत नसल्यामुळे एकनाथ तिला विठ्ठलाच्या चरणी ठेवतो आणि देवाला खडे बोल सुनावतो. तोच चमत्कार होतो आणि सावली श्वास घ्यायला लागते. विठ्ठलाच्या सावलीत तिने श्वास घेतला त्यामुळे एकनाथ तिचं नाव सावली ठेवतो. याचदरम्यान सुप्रसिद्ध गायिका भैरवी वझेची नजर सावलीच्या गायनावर पडते. आपल्या मुलीला म्हणजे ताराला मोठी गायिका बनवण्याचं स्वप्न बघणारी भैरवी सावलीच्या बिकट आर्थिक परिस्थतीचा फायदा घेत तिच्या वडिलांसोबत एक करार करते ज्यात ती सावलीचा आवाज आयुष्यभरासाठी स्वतःकडे गहाण ठेवते.
त्याचवेळी शहरातल्या सगळ्यात मोठ्या कॉस्मेटीक्स कंपनीची मालकीण असलेली तिलोत्तमा आपल्या धाकट्या मुलासाठी म्हणजेच सारंग साठी योग्य वधू शोधत असते. तिलोत्तमाच्या घरात, तिच्या जगात आसपास कुठेही कुरूप गोष्टीना जागा नाही. तिच्या घरात फक्त तीनच तऱ्हेच्या गोष्टी खपवून घेतल्या जातात ..सुंदर ..अतिसुंदर आणि नितांतसुंदर...! तिलोत्तमा सारंगवर जीवापाड प्रेम करते आणि अशा या घराशी कळत नकळत धागे जुळत जातात सावलीचे.
या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, साईंकित कामत, गौरी किरण अश्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं अजून एक विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे या मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कोठारे व्हिजनची ही मालिका असून महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे या मालिकेचे निर्माते आहेत. सावलीची कहाणी ‘सावळ्याची जणू सावली’ १६ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.