बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान(Shahrukh Khan)चा 'पठाण' (Pathaan) चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर नायकाच्या रुपात पुनरागमन करत आहे. किंग खान पहिल्यांदाच रोमान्सपेक्षा अॅक्शन करताना दिसणार आहे. पठाणकडून प्रेक्षकांना खूप आशा आहेत. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अॅक्शन चित्रपट म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या पठाण चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नेटकरी याबद्दल बोलून थकत नाहीत. आता असे सांगितले जात आहे की पठाण चित्रपटाचा ट्रेलर दुबईच्या प्रसिद्ध बुर्ज खलिफावर दाखवला जाणार आहे.
शाहरुख खान सध्या युएईमध्ये आहे. तो आंतरराष्ट्रीय लीग T20 चा भाग बनण्यासाठी आला आहे. यशराज फिल्म्सने पुष्टी दिली आहे की शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर पाहायला मिळणार आहे. इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशनचे उपाध्यक्ष नेल्सन डिसोझा यांनी याबद्दल सांगितले की, 'पठाण हा चित्रपट आहे ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. असा चित्रपट प्रेक्षकांसमोर भव्य पद्धतीने मांडावा लागतो. आम्हाला कळवायला अतिशय आनंद होत आहे की दुबई शाहरुख खान साजरा करणार आहे. यासाठी त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले की, 'आम्हाला आनंद आहे की शाहरुख खान, जो सध्या इंटरनॅशनल लीग T20 साठी UAE मध्ये आहे, तो जगातील सर्वात सुंदर इमारतीमध्ये ट्रेलर पाहण्यासाठी वेळ काढेल. शाहरुख खानचे UAE मध्ये खूप मोठे चाहते आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की यामुळे पठाणच्या सध्याच्या काळात चाललेल्या प्रमोशनमध्ये भर पडेल. या ट्रेलरला प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार. त्यांच्यामुळेच हे घडत आहे.पठाण या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडियासारखे स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट २५ जानेवारीला हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.