Join us

'त्यांचं' हत्तीप्रेम जगाने पाहिलं, पण 'त्यांनी' अजून The Elephant Whisperers पूर्ण पाहिलेली नाही; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 9:15 AM

भारतीय सिनेजगतासाठी १३ मार्च २०२३ हा दिवस ऐतिहास ठरला. संपूर्ण भारताचं लक्ष आजच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे लागलं होतं

देशाला पहिला ऑस्कर मिळालेल्या डॉक्युमेंटरी फिल्ममुळे देशातील प्रत्येकाला अत्यानंद झाला. जभरातून भारताचं कौतुक होऊ लागलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन या फिल्मचं आणि कथेचं कौतुक केलं. मात्र, ज्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट भाष्य करतो, ज्यांच्या आयुष्यातील प्रेरक आणि तितक्याच भावनिक कथेतून हा सिनेमा साकारला त्या बोमन आणि बेल्ली यांना या ऑस्करची कल्पनाच नव्हती. ऑस्कर आहे काय किंवा तो मिळाल्यानंतर काय, अशी सूतरामही कल्पना नसलेलं हे जोडपं कालही दिवसभर आपल्या हत्तीच्या काळजीतच रमलेलं होतं. 

भारतीय सिनेजगतासाठी १३ मार्च २०२३ हा दिवस ऐतिहास ठरला. संपूर्ण भारताचं लक्ष आजच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे लागलं होतं आणि भारताने यंदा दोन पुरस्कार नावावर केले आहेत. आज सोहळ्यात देशाला पहिला ऑस्कर मिळाला तो 'द एलिफंट व्हिस्पर्स' (The Elephant Whisperers) या शॉर्ट फिल्मसाठी. या ऑस्कर विजयानंतर भारतात जल्लोष सुरू झाला, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव दिसला, अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सिनेमा आणि कलाकारांचं कौतुक होऊ लागलं. कुणालाही माहिती नसलेले, 'द एलिफंट व्हिस्पर्स'चे खरे हिरो बोमन आणि बेल्ली जगाला माहिती झाले. मात्र, आपल्या आयुष्यावर आधारित चित्रपटाला ऑस्कर मिळालाय हेच त्यांना माहिती नव्हतं. विशेष म्हणजे अद्यापपर्यंत त्यांनी तो चित्रपटही पाहिला नाही. 

५५ वर्षीय बोमन आणि त्याची पत्नी बेल्ली त्या दिवशीही हत्तीच्या संगोपनात आणि त्यांची काळजी घेण्यात तामिळनाडूच्या धरमपुरी येथील जंगलात रमले होते. अद्याप त्यांनी हा चित्रपटही पाहिला नाही, केवळ चित्रपटाचा काही भाग त्यांनी अनुभवला आहे. मात्र, ऑस्करची घोषणा झाली अन् बोमन-बेल्ली जगभरात प्रसिद्ध झाले. ऑस्कर विजयानंतर बोमनला विचारले असता तो म्हणाला, हे खूप चांगलं आहे, पण त्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. मी निवडलेले काम हे जंगली हत्ती पाळणे आणि त्यांची पिल्ले सांभाळणे हे आहे, त्यातच मला आनंद मिळतो. दरम्यान, बोमन गेल्या २८ वर्षांपासून माहुत बनून काम करतोय. 

चित्रपट निर्मात्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं, त्यांना ओळख मिळाली हे ऐकून बरं वाटलं. मला आनंद झाला, असे बेल्लीने म्हटले. 

दरम्यान, सर्वप्रथम ही डॉक्युमेंटरी बोमन आणि बेल्ली यांनाच दाखवण्यात आली होती, असे डॉक्युमेटरी चित्रपटाची निर्माता कार्तिकी गोन्साल्व्हिस यांनी ट्विट करुन म्हटलंय. ते जंगलात राहत असल्याने तेथे चॅनेल्ससाठी रेंज येत नाही, असेही त्यांनी म्हटलंय.

काय आहे द एलिफंट व्हिस्पर्स

'द एलिफंट व्हिस्पर्स' ही खऱ्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म असून कार्तिकी गोंजाल्विस (Kartiki Gonsalves) यांनी दिग्दर्शित केली आहे. याची गोष्ट जंगलात जीवन जगणाऱ्या बोमन आणि बेली यांच्या जीवनावर आधारित आहे. हे एक आदिवासी जोडपं आहे. आदिवासी पाड्यात राहणापे रघु आणि अम्मु या दोन हत्तींचं त्यांनी पालन केलं आणि त्यांना चांगलं जीवन दिलं. ४० मिनिटांच्या या फिल्ममध्ये मनुष्य आणि प्राण्यांमधील भावनिक, संवेदनशीलृ दृश्य दाखवण्यात आली आहे.सामान्य आयुष्य जगणारे बोमन आणि बेली यांचा प्राण्यांप्रती असलेले प्रेम आणि त्यांचा संघर्ष यावर फिल्म आधारित आहे.  

टॅग्स :ऑस्करतामिळनाडूजंगलवनविभाग